T20 World Cup 2022, Babar Azam : विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गड्यांनी पराभव केला. विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंह या त्रिकुटाच्या जिगरबाज खेळीच्या बळावर भारताने रोमांचक सामन्यात बाजी मारली. विजयानंतर भारतामध्ये जल्लोष करण्यात येत आहे. पाकिस्तानमधील क्रीडा चाहत्यांमध्ये मात्र निराशाचं वातावरण आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझमनं सामन्यात नेमकी चूक कुठे झाली, याचा उलगडा केला आहे.
विराट-हार्दिकनं विजय हिसकावला -
पराभवानंतर बाबर आझम चेहऱ्यावर निराशा दिसत होती. सामन्यानंतर तो म्हणाला की, आमच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. पण विराट कोहली आणि हार्दिक पांड्याच्या जबरदस्त फलंदाजीनं सामना आमच्या हातून निसटला. मेलबर्नच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं सोप्प नव्हतं. खासकरुन सुरुवातीच्या दहा षटकांमध्ये... पण आम्ही आमच्या रणनीतीवर कायम होतो. त्यानुसार आम्ही गोलंदाजी केली. आम्ही उत्कृष्ट खेळलो. पण हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीच्या भागिदारीनं सामना आमच्या हातून निसटला. त्यांनी जबरदस्त फलंदाजी केली.
पराभवानंतरही खूप काही सकारात्मक गोष्टी घडल्या -
मिडल ओव्हरमध्ये आम्हाला विकेट हव्या होत्या, त्यामुळे चेंडू फिरकी गोलंदाजांच्या हातात दिला. या सामन्यात पराभव झाला असला तरीही बऱ्याच सकारत्मक गोष्टी घडल्या. सुरुवातीला विकेट पडल्यानंतर शान मसूद आणि इफ्तिखार अहमद यांनी संघाचा डाव सावरला, हे आमच्यासाठी सकारात्मक आहे, असे बाबर आझम म्हणाला.
कोहली-पांड्याची शतकी भागिदारी -
कोहली आणि पांड्या यांची शतकी भागिदारी भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी 113 धावांची विक्रमी भागिदारी केली. ज्यामुळे भारताचा विजय सोपा झाला. सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा प्रत्येकी 4 धावा करुन तंबूत परतले. त्यानंतर सूर्यकुमारही 15 धावा करुन बाद झाला. मग अक्षर 2 धावांवर धावचीत झाला आणि 50 धावांच्या आतच भारताचे 4 गडी तंबूत परतले. त्यानंतर हार्दिक आणि विराट कोहली यांनी शतकी भागिदारी केली.
सामन्याचा लेखा-जोखा
नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानला भारतासमोर आधी फलंदाजी करणं अवघड ठरत असल्यानं रोहितनं हा निर्णय़ घेतला. त्यानुसारच भारतीय गोलंदाजांनी सुरुवातही दमदार केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबरला 0 धावांवर तंबूत धाडत अर्शदीपने पहिली विकेट घेतली. त्यानंतरही भारताने गोलंदाजी कसून सुरुच ठेवली. 4 धावा करुन रिझवानही बाद झाला. पण त्यानंतर शान मकसूद (52) आणि इफ्तिकार अहमद (51) यांनी डाव सावरला आणि दोघांनी दमदार अर्धशतकं ठोकत पाकिस्तानची धावसंख्या सावरली. त्यांच्याशिवाय इतर फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण गोलंदाज शाहीन आफ्रिदीने 8 चेंडूत 16 धावांची खेळी करत आणखी योगदान दिलं. ज्यामुळे पाकिस्तानने 159 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. भारतीय संघानं 160 धावांचं लक्ष्य गाठताना चार विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पावर प्लेमध्ये भारताने कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची महत्वाची विकेट्स गमावली. त्यानंतर सूर्यकुमार यादवही स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं संघाची जबाबदारी खांद्यावर घेत भारताच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकात भारताला 16 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. मात्र, विराट कोहलीनं संघाची बाजू संभाळून ठेवत भारताला विजय मिळवून दिला.