लंडन : इंग्लंडमधील विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी रविवारी मॅन्चेस्टरमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. जगभरातील करोडो क्रिकेट फॅन्सची नजर या सामन्यावर आहे. मात्र या सामन्यावर पावसाचीही नजर आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट आहे.


भारताचा सामना ज्या मॅन्चेस्टरमध्ये होणार आहे, तेथे शुक्रवार जोरदार पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे मैदानात पाणी साचलं आहे. 48 तास उलटले तरीही पावसाची स्थिती कायम आहे. या पावसामुळे भारत-पाकिस्तान हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.


पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघाना फटका बसण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाचा विश्वचषकात एक-एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. रविवारचा सामनाही रद्द झाल्यास दोन्ही संघासाठी ही चिंतेची बाब असणार आहे. विश्वचषकातील भारताचा हा चौथा तर पाकिस्तानचा पाचवा सामना आहे.


इंग्लंडच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मॅन्चेस्टरमध्ये शनिवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र रविवारी तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र थोडा पाऊस पडला तरी सामन्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.


VIDEO | ICC world cup 2019 | यंदाचा विश्वचषक पाण्यात खेळायचा का?



विश्वचषकात पावसामुळे चार सामने रद्द


यंदाच्या विश्वचषकातील 18 पैकी 4 सामने पावसामुळे रद्द झाले आहे. ब्रिस्टल येथील 7 जूनला पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेच्या सामन्यात पावसामुळे नाणेफेकही झाली नाही. नाणेफेक न करताच हा सामना रद्द करण्यात आला.


10 जूनला साऊथॅम्प्टन येथील दक्षिण अफ्रिका विरद्ध वेस्टइंडिजच्या सामन्यात केवळ 7.3 षटके खेळली गेली. पुढे हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. 11 जूनचा ब्रिस्टल येथील श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामनाही नाणेफेक न होताच रद्द करण्यात आला होता. तर भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता.