लातूर : विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याच प्रकार लातुरात घडला आहे. योगवशिष्ठ शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत असलेल्या तिन्हीही विद्यालयात संस्थाचालकांचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे त्रस्त शिक्षकांनी येथील जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले होते. उपोषणाच्या पाचव्या दिवशी संतप्त शिक्षकांनी शिक्षणाधिकारी यांचे दालनात प्रचंड गोंधळ घातला. त्यातील एका शिक्षिकेने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.


या घटनेमुळे लातूर जिल्हापरिषदेचे सीईओ बिपीन इटनकर यांनी स्वत: शिक्षकांची भेट केली. त्यानंतर काल दुपारी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आंदोलक शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यातील सोळा शिक्षक आता फरार आहेत, शिवाजी नगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे


काय आहे प्रकरण?


मागील अनेक वर्षांपासून योगवशिष्ठ शिक्षण प्रसारक मंडळातील शिक्षक हे या संस्थेचे प्रमुख रामदास पवार आणि त्याच्या कुटुंबियाच्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक पिळवणुकीला कंटाळले आहेत. काही तक्रार करायला गेले तर नोकरासारखी वागणूक दिली जाते. अश्लील भाषेत शिवीगाळ केली जाते, असा आरोप शिक्षकांनी केला आहे. यापूर्वीही काही शिक्षकांनी या संस्थाचालकांविरोधात तक्रार नोंद केली, मात्र कारवाई न झाल्याने पीडित शिक्षकांना उपोषणाचं हत्यार उपसलं होतं.


काय आहेत शिक्षकांच्या मागण्या?


- शाळेच्या इमारतीसाठी शिक्षकांकडून घेतलेले पैसे परत करावेत, रंगकामासाठी प्रत्येक शिक्षकाकडून घेतलेले 28 हजार रुपये परत करावेत
- महिला शिक्षकांना आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल संस्था सचिव व त्यांचा मुलगा किरण पवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा
- नियमित पगार देण्यात यावा