मुंबई : इंग्लंडमधल्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी रविवारी मॅन्चेस्टरमध्ये आमनेसामने येतील. वन डे सामन्यांच्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान संघांत आजवर सहा सामने झाले आहेत. आणि विशेष म्हणजे भारतीय संघाने ते सहाही सामने जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. भारतीय संघाच्या या यशोकहाणीवर एक नजर


भारत आणि पाकिस्तान हे सख्खे शेजारी आणि एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी. साहजिकच भारत आणि पाकिस्तानच्या फौजा क्रिकेटच्या मैदानात उतरतात, त्यावेळी तो नेहमीचा क्रिकेट सामना नसतो, तर ती असते परस्परांच्या राष्ट्रीय अस्मितेची लढाई. आणि तो सामना विश्वचषकातला असेल, तर मग क्रिकेटच्या मैदानालाही जणू रणभूमीचं स्वरुप मिळतं.

इंग्लंडमधल्या विश्वचषकात टीम इंडिया आणि पाकिस्तान मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर आमनेसामने येत आहेत. पावसाच्या संततधारेमुळे साऱ्या इंग्लंडमधलं वातावरण सध्या थंड असलं तरी भारत-पाकिस्तान सामन्यांच्या निमित्ताने मॅन्चेस्टरसह क्रिकेटविश्वातलं वातावरण तापलेलं आहे.

वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान संघांत आजवर सहा सामने खेळवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सहाही वेळा भारतीय संघाने पाकिस्तानवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे.

विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले ते 1992 साली. जावेद मियांदादनं किरण मोरेला डिवचण्यासाठी मारलेल्या उड्यांनी हा अधिक सामना गाजला. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरच्या या सामन्यात इम्रान खान अॅण्ड कंपनीच्या तोफखान्यासमोर भारताला अवघी 216 धावांचीच मजल मारता आली होती. पण कपिल देव, मनोज प्रभाकर, जवागल श्रीनाथ, सचिन तेंडुलकर आणि वेंकटपती राजू या संमिश्र आक्रमणासमोर पाकिस्तानचा अख्खा डाव 173 धावांत आटोपला. भारताने हा सामना 43 धावांनी जिंकला.

1996 सालच्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान उपांत्यपूर्व फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले. अजय जाडेजाने वकार युनूसवर चढवलेला हल्ला आणि वेंकटेश प्रसादने आमिर सोहेलला त्याच्याच भाषेत दिलेलं उत्तर या दोन क्षणांसाठी हा सामना आजही लक्षात आहे. या सामन्यात पाकिस्तानने भारताकडून 39 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताने दिलेल्या 288 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 248 धावांत आटोपला.

1999 सालच्या विश्वचषकात मोहम्मद अझरुद्दिनच्या भारतीय संघाची कामगिरी लौकिकास साजेशी होत नव्हती. पण भारतीय संघाने पाकिस्तानला आपल्यावर शिरजोर होऊ दिलं नाही. या सामन्यात भारतीय संघाला 50 षटकांत 227 धावांची मजल मारता आली होती. त्यामुळे पाकिस्तानचं पारडं जड मानलं जात होतं. पण भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा अख्खा डाव 147 धावांत गुंडाळून कमाल केली. या सामन्यात पाच विकेट्स घेणारा वेंकटेश प्रसाद आणि तीन विकेट्स घेणारा जवागल श्रीनाथ हे भारताच्या त्या विजयाचे हीरो ठरले.

2003 सालची भारत-पाकिस्तान लढत ही विश्वचषकाच्या इतिहासातली सर्वोत्तम आणि अविस्मरणीय ठरली. सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरला डीप थर्डमॅनच्या डोक्यावरुन मारलेला षटकार आजही अंगावर काटा आणतो. सचिन आणि सहवागच्या स्फोटक सलामीने भारताच्या आव्हानात जान भरली. सचिनच्या 98 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानने दिलेलं 273 धावांचं लक्ष्य सहा विकेट्स राखून पार केलं.

2011 सालच्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी उपांत्य फेरीत आमनेसामने आले. पण याही वेळी टीम इंडियाने पाकिस्तानची डाळ शिजू दिली नाही. सचिन तेंडुलकरने 85 धावांची खेळी उभारुन भारताला नऊ बाद 260 धावांची मजल मारुन दिली. मग भारताच्या आक्रमणासमोर पाकिस्तानचा अख्खा डाव 231 धावांत गडगडला आणि धोनीच्या टीम इंडियाने 28 वर्षांनी पुन्हा विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली.

2015 साली भारत आणि पाकिस्तान संघ विश्वचषकाच्या साखळीत आमनेसामने आले. मैदान होतं ऑस्ट्रेलियातलं अॅडलेड ओव्हल. विराट कोहलीच्या शतकाला शिखर धवन आणि सुरेश रैनाची मिळालेली साथ टीम इंडियाला तीनशेचा भोज्या करुन देणारी ठरली. भारताने विजयासाठी दिलेलं 301 धावांचं आव्हान पाकिस्तानला पेलवलंच नाही. मोहम्मद शमीने चार, तर उमेश यादव आणि मोहित शर्माने दोन-दोन विकेट्स काढून पाकिस्तानचा अख्खा डाव 224 धावांत गुंडाळला.

भारतीय संघाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानवर गाजवलेलं हे निर्विवाद वर्चस्व विराट कोहलीच्या टीम इंडियाला स्फुरण देणारं ठरावं. त्यामुळे मॅन्चेस्टरच्या रणांगणातही आपला तिरंगा डौलानं फडकेल, हाच तमाम भारतीयांची विश्वास आहे.