सातारा : उदयनराजेंवर 302 चे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी जरा छत्रपतींसारखं वागावं, असं म्हणत रामराजे नाईक निंबाळकरांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे.  बारामतीच्या पाणीप्रश्नावरुन राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना घरचा आहेर देणाऱ्या उदयनराजेंवर रामराजे निंबाळकरांनी टीका केली आहे.


सगळी संस्थानं खालसा झाली. संस्थानं खालसा झाल्यावर कुणी छत्रपती लावत का? आताचे छत्रपती हे स्वयंघोषित आहेत. लोकं महाराज म्हणतात म्हणून आम्ही महाराज म्हणतो. ते छत्रपतींचे वंशज आहेत हे मान्य आहे, मात्र छत्रपती असल्यासारखं वागा. कमीत कमी सूर्याजी पिसाळासारखं वागू नका, एका बाजूला एक बोलायचं दुसऱ्या बाजूला एक बोलायचं, अशा शब्दात रामराजे निंबाळकरांनी उदयनराजेंवर टीका केली.

निंबाळकर पुढे म्हणाले की, ते मला निवडणुकांपुरते गोड बोलले. मला रोज 'यायला पाहिजे' म्हणून फोन करायचे. आता लगेच बदलले. त्यांनी माझे चांगले गुण घेतले म्हणतात, म्हणजे माझ्याकडे चांगले गुण आहेत.

निंबाळकर म्हणाले की, तुमच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. खंडणीचे  गुन्हे खरे की खोटे हे कोर्ट ठरवेल. तुम्ही ठरवू शकत नाहीत. कुठलाही आरोपी आपला गुन्हा मान्य करत नाही. कोर्टाचे निर्णय मान्य नसतील तर शेवटी आपण तेरावे वंशज आहात. महाराष्ट्र आपला गुलाम आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र राज्य गुलाम असेल फलटणमध्ये कुणी गुलाम नाही.

यावेळी बोलताना त्यांनी जयकुमार गोरे यांच्यावरही टीका केली. 'नाईक निंबाळकर दाखवा एकशे एक रुपये मिळवा' या त्यांच्या टीकेला उत्तर देताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, मी माझ्या फलटणच्या जुन्या घरी असतो. तिथं घेऊन गोरेंनी मला बघावं, मात्र मला त्यांचे तोंड बघण्याची इच्छा नाही, असे ते म्हणाले.

उदयनराजेंनी काय केले होते आरोप

नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरुन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला  होता. त्यांनी  राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. स्वतःच्या स्वार्थासाठी 14 वर्ष पाणी बारामतीला पळवलं. जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं, असा गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे असंही उदयनराजेंनी म्हटलं होतं.

भाजप सरकारचा पवारांना दणका, बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा दुष्काळी भागाला

माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजित निंबाळकर यांनी निवडून येताच सांगोला येथील दुष्काळी बैठकीत याबाबत आवाज उठवत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाण्याची मागणी केली होती. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेत बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा उजव्या कालव्यातील दुष्काळी भागात वळवण्यात आले आहे. या दुष्काळी भागात सांगोला, माळशिरस, पंढरपूर फलटणला या भागांचा समावेश येतो.

आता पुन्हा एकदा 1954च्या कायद्यानुसार हे पाणीवाटप करण्याचा मोठा निर्णय भाजप सरकारने घेतला. बारामतीला वळवलेले दुष्काळी भागाच्या हक्काचे पाणी पुन्हा एकदा या भागाला मिळणार असल्याने या भागातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून त्यांची तहान भागणार आहे.

आणखी वाचा
भाजप सरकारचा पवारांना दणका, बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा दुष्काळी भागाला

बारामतीकरांनी 14 वर्षे नीरेचं पाणी पळवलं, उदयनराजेंची रामराजे निंबाळकर आणि शरद पवारांवर टीका