बुडापेस्ट : आशियाई विक्रम मोडून पहिल्यांदा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या (World Athletics Championships) अंतिम फेरीत प्रवेश करणारा भारताचा 4x400 मीटर रिले (4x400m Relay) पुरुष संघ पाचव्या स्थानावर राहिला. भारताच्या मोहम्मद अनस याहिया, अमोज जेकर, मोहम्मद अजमल वारियाथोडी आणि राजेश रमेश या चौघांनी अंतिम फेरीत 2 मिनिट 59.92 सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली.


या स्पर्धेत अमेरिकेच्या संघाला सुवर्ण (2:57.31), फ्रान्सच्या संघाला रौप्य (2:57.31) आणि ग्रेट ब्रिटनच्या संघाला कांस्य पदक (2:58.71) मिळालं. तर जमैकाचा संघाला (2:59.34) या शर्यतीत चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. त्यापाठोपाठ भारतीय संघ पाचव्या स्थानावर राहिला.




क्वॉलिफाईंग रेसमध्ये भारतीय संघाची विक्रमी कामगिरी


याआधी भारतीय संघाने शनिवारी हिट म्हणजे क्वॉलिफाईंग रेसमध्ये अमेरिकेनंतर (2:58.47) दुसरं स्थान मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. प्रत्येक दो हिटमध्ये पहिल्या तीन स्थानावर राहणारी आणि पुढील सर्वात वेगवान असलेला संघच अंतिम फेरीत पोहोचतो.


आशियाई विक्रम 2 मिनिट 59.51 सेकंदाचा होता, जो जपानच्या संघाच्या नावावर होता. भारतीय संघाने 2 मिनिट 59.05 सेकंदांनी हे अंतर पार करुन हा विक्रम मोडला होता. त्याआधी राष्ट्रीय विक्रम 2021 मध्ये प्रस्थापित झाला होता, जो 3:00.25 मिनिटांचा होता.


भारतीय धावपटूंनी विक्रविक्रम असलेल्या अमेरिकन टीमला कडवं आव्हान देऊन त्यांच्या मागोमागाच दुसरं स्थान मिळवलं होतं. भारतीय संघ दो हिटमध्ये अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर होता. संघाने ग्रेट ब्रिटन (2:59.42 मिनिटं) आणि जमैका (2:59.82 मिनिटं) यांच्यापेक्षा आधीचं स्थान मिळवलं. ग्रेट ब्रिटनने तिसरं तर जमैकन संघाने पाचवं स्थान मिळवलं होतं. 


फायनलमध्ये क्वॉलिफाईंग रेसची कामगिरी करण्यात अपयश


त्यामुळे अंतिम फेरीत भारतीय संघाकडून तमाम चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु फायनलमध्ये भारताला हिटमधील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. अंतिम फेरीत अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले. तर जमैकन संघ चौथ्या आणि त्यानंतर भारतीय संघ पाचव्या स्थानावर राहिला.


हेही वाचा


भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास!