नवी मुंबईः न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड उद्या केली जाणार आहे. त्यासाठी संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीची बैठक उद्या सकाळी मुंबईत होणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता पत्रकार परिषदेत भारतीय संघ जाहीर केला जाईल.
टीम इंडियाने नुकतंच वेस्ट इंडिजमधील कसोटी मालिकेत 2-0 असा विजय साजरा केला होता. विराट कोहलीच्या टीमला आता मायदेशात येत्या सहा महिन्यांत 13 कसोटी सामने खेळायचे आहेत. भारताच्या या परिक्षेची सुरूवात 22 सप्टेंबरला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेने होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघात कुणाला स्थान मिळतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
या खेळाडूंवर होईल चर्चा
वेस्ट इंडिज दौऱ्यात 2-0 असा विजय साजरा केल्यानंतर टीम इंडियात मोठा बदल अपेक्षित नाही. मात्र काही खेळाडूंचा सध्याचा फॉर्म पाहता संघात त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अष्टपैलू फलंदाज गौतम गंभीरनेही त्याच्या फॉर्मने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे त्याच्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
गंभीरने दुलीप ट्रॉफीत आतापर्यंत चार अर्धशतकी इनिंगची खेळी केली आहे. गंभीरने आतापर्यंत 80 च्या सरासरीने 320 धावा ठोकल्या आहेत. यामध्ये 77, 57, 90 आणि 94 अशा इनिंगचा समावेश आहे.
मुरली विजय, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा या सहा जणांचं न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघातलं स्थान निश्चित मानलं जातं आहे. रोहितने आजवर कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी बजावलेली नाही. मात्र रोहितची भारतातली कामगिरी आणि कर्णधार कोहलीचा त्याच्यावरचा विश्वास पाहता रोहितला या मालिकेत खेळण्याची संधी मिळू शकते.
लोकेश राहुलचा ताजा फॉर्म पाहता, चेतेश्वर पुजाराला भारतीय संघात स्थान मिळणार की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेलं. गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये पुजाराला मोठी खेळी करता आलेली नाही. पण नुकतंच दुलीप करंडक स्पर्धेत पुजाराने सलग दोन शतकं झळकावली होती.
लोकेश राहुलने विंडीजमध्ये सलामीला खेळताना दमदार कामगिरी बजावली होती. पुजारा आणि राहुलबरोबरच श्रेयस अय्यर, मनीष पांडे आणि करुण नायर या युवा फलंदाजांच्या नावावरही निवड समितीच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.