मुंबई : 'बार बार देखो' या सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ यांच्या चित्रपटातलं गाणं 'काला चष्मा' सध्या अनेकांच्या मोबाईल फोनमध्ये ऐकायला मिळत आहे. वेगवेगळ्या वयोगटातील रसिकांना ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्याचे बोल कोणी लिहिले आहेत, याची तुम्हाला कल्पना आहे का?

 
पंजाबच्या पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका कॉन्स्टेबलच्या लेखणीतून हे गाणं उतरलं आहे. अम्रिक सिंग शेरा असं या 43 वर्षीय गीतकाराचं नाव आहे. विशेष म्हणजे शेरा यांनी हे गाणं 90 च्या दशकात लिहिलं होतं.

 
अम्रिक सिंग शेरा पंजाबच्या कपुरतळा पोलिस स्टेशनमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. जालंधरजवळ तलवंडी या खेडेगावात राहणाऱ्या शेरा यांनी वयाच्या 17 व्या वर्षी हे गाणं लिहिलं होतं.

 
'दोन महिन्यांपूर्वी माझ्या एका मित्राने काला चष्मा हे गाणं टीव्हीवर पाहिल्याचं सांगितलं. मी खूप खुश झालो, पण तितकाच धक्काही बसला. चार महिन्यांपूर्वी जालंधरच्या एका कंपनीने सिमेंट कंपनीला उद्घाटनासाठी हे गाणं हवं असल्याचं सांगितलं. 11 हजार रुपयांच्या मोबदल्यात हा करार झाला. मला कंपनीचं नावही माहित नाही. त्यामुळे हे गाणं सिनेमात झळकेल, याची कल्पना नव्हती. मात्र आपली कोणतीही तक्रार नाही' असं शेरा सांगतात.