सेहवाग आणि धोनी यांच्यातील अप्रत्यक्ष वाद याआधीही अनेकदा समोर आलेला आहे. तो वाद तर याला कारणीभूत नाही ना, अशी चर्चा आता रंगली आहे. धोनीच्या निर्णयावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुरेश रैना यांच्यासह अनेक खेळाडूंनी मत व्यक्त केलं. सचिननेही धोनीच्या निर्णयाचा आदर केला आहे.
धोनी विरुद्ध सेहवाग
सेहवागला भारतीय संघातून आऊट करण्याला धोनी कारणीभूत आहे, असं नेहमी बोललं जातं. शिवाय वीरुने याआधी अनेकदा आपली धोनीविषयीची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवलेली आहे.
दिल्लीमध्ये वीरुला क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआयकडून निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये वीरुने त्याच्या कारकीर्दीतील सर्व कर्णधारांचे आभार मानले होते. अजय जाडेजा, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे या सर्वांचे त्याने आभार मानले. मात्र आपल्या भाषणात त्याने धोनीचं नाव कुठेही घेतलं नाही. विशेष म्हणजे धोनीच्या नेतृत्वात वीरु सहा वर्षे खेळला आहे.
2007 मध्ये वीरुऐवजी धोनी कर्णधार
राहुल द्रविडने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर वीरुकडे कर्णधारपद दिलं जाईल, अशी सर्वांना आशा होती. मात्र तसं न होता संघातील त्या वेळचा युवा खेळाडू धोनीकडे बीसीसीआयने कर्णधारपदाची धुरा सोपवली.
2008 मध्ये वीरुऐवजी उथप्पाला संधी
2008 साली कॉमनवेल्थ बँक सीरिजमध्ये वीरु आणि धोनी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला. या मालिकेसाठी वीरु तंदुरुस्त नसल्याचं कारण देत धोनीने निवड समितीला रॉबिन उथप्पाचं नाव सुचवल्याचं बोललं जातं.
मात्र वीरुने त्याचवेळी आपण तंदुरुस्त असल्याचंही स्पष्ट केलं होतं. पण मालिकेत त्यावेळी वीरुऐवजी उथप्पालाच संधी देण्यात आली होती.
दोघांमधील फूट पहिल्यांदाच मीडियासमोर
इंग्लडमध्ये 2009 साली टी ट्वेंटी विश्वचषकादरम्यान दोघांमधील फूट जाहीरपणे दिसून आली. या मालिकेत बांगलादेशवीरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलला. मात्र या पत्रकार परिषदेत त्याला सेहवागसोबतच्या फुटीबद्दल कोणताही प्रश्न विचारण्यात आला नाही.
मात्र त्याच्या एक दिवस अगोदर धोनीला सेहवागच्या खांद्याच्या दुखापतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. पण धोनीने यावर सर्वांना आश्चर्यचकित करणारं उत्तर दिलं. तुम्ही माझ्याऐवजी सेहवागच्या फिजिओला हा प्रश्न विचारावा, असा सल्ला धोनीने रिपोर्टरला दिला. यावेळी प्रथमच दोघांमधील फूट जाहीरपणे उघड झाली.
उपकर्णधार राहण्यास वीरुचा नकार
वीरु आणि धोनी यांच्यातील संबंध किती दुरावले आहेत, याचा अनुभव ऑक्टोबर 2009 साली आला. वीरुने टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून खेळण्यास यावेळी नकार दिला. आपण उपकर्णधार म्हणून नव्हे, तर कर्णधार म्हणून खेळण्यास तयार आहोत, असं वीरुने जाहीर केलं.
अंतिम 11 खेळाडू निवडण्याचं आव्हान
ऑस्ट्रेलियातील 2012 सालच्या तिंरगी मालिकेदरम्यान धोनीसमोर अंतिम 11 खेळाडू निवडण्याचं मोठं आव्हान समोर असायचं. यावेळी सेहवाग आणि धोनी यांच्यातील वाद समोर आला.
या मालिकेदरम्यान धोनीने सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. पण पहिल्या समान्यात ऑस्ट्रेलियासोबत विजय मिळवल्यानंतर धोनीने तिघांना विश्रांती का दिली, यावर उत्तर दिलं.
या तिन्ही सिनीअर खेळाडूंना एकाच वेळी त्यांचा फॉर्म आणि क्षेत्ररक्षण या कारणांमुळे अंतिम 11 खेळाडूंमध्ये घेतलं नाही, असं उत्तर धोनीने दिलं होत.
पण वीरुनेही तुम्ही मी घेतलेला झेल कधी पाहिलाय का, मी गेल्या 10 वर्षांपासून असंच क्षेत्ररक्षण करत आहे, असं म्हणत टोला लगावला होता.
धोनीने मीडियाला काय सांगितलं किंवा मीडियात काय चर्चा आहे, हे आपल्याला माहित नाही. पण युवा खेळाडूंना खेळण्याची संधी द्यायची आहे, कारण ते येत्या काळात ऑस्ट्रेलियात विश्वचषक खेळणार आहेत, असं कारण धोनीने दिल्याचं वीरुने पत्रकारांना सांगितलं होतं.
धोनी विरुद्ध वरिष्ठ खेळाडू वाद
भारताचे माजी क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ यांनीही धोनीला लक्ष्य केलं होतं. त्यांची निवड समितीचे अध्यक्ष म्हणून निवड होईल, असं बोललं जात होतं. मात्र धोनीच्या कसोटीतील कामगिरीवर बोलल्यामुळे आपल्याला डावलण्यात आलं, असा आरोप मोहिंदर अमरनाथ यांनी केला होता.
शिवाय माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही निवृत्तीनंतरच्या एका कार्यक्रमासाठी धोनीला निमंत्रण दिलं नव्हतं. ज्यामध्ये सर्व आजी माजी खेळाडूंचा समावेश होता.
वीरुचं मैदानावर खच्चीकरण?
वीरु स्फोटक फलंदाज म्हणूनच नाही तर एक चांगला गोलंदाज म्हणूनही परिचीत होता. त्याने 104 कसोटींमध्ये 40, तर 251 वन डे सामन्यांमध्ये 96 विकेट्स घेतल्या आहेत. धोनी वीरुला त्याच्या चांगल्या फॉर्ममुळे स्फोटक फलंदाजीपासून तर रोखू शकला नाही. पण धोनीने वीरुला गोलंदाजीची संधी क्वचितच दिल्याचं दिसून आलं.
संबंधित बातम्या :