मुंबई : भारताची फुलराणी सायना नेहवालनेही आता भाजपचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला आहे. सायनाच्या साथीने तिची थोरली बहीण चंद्रांशू नेहवालही भारतीय जनता पक्षात सामील झाली आहे.


2014 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांच्या हातात भाजपची सूत्रं आली आणि भारतीय क्रीडाक्षेत्रातल्या तारेतारकांचा ओढा हा भाजपच्या दिसू लागला. सायना नेहवालनेही भाजप प्रवेशामागचं आपलं प्रेरणास्थान म्हणून पंतप्रधान मोदी यांच्याच नावाचा उल्लेख केला आहे. ऑलिम्पिक रौप्यविजेता नेमबाज राज्यवर्धन राठोरपासून अगदी अलीकडच्या काळात भाजपमध्ये दाखल झालेल्या गौतम गंभीर आणि बबिता फोगाट यांनाही विचारलं तर भाजप प्रवेशामागचं प्रेरणास्थान म्हणून ही मंडळीही मोदीचंच नाव घेतील.


नरेंद्र मोदी हे 2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यापासून त्यांचा विविध ऑलिम्पिक क्रीडाप्रकार आणि त्यातल्या खेळाडूंसोबतचा वावर आजवरच्या पंतप्रधानांच्या तुलनेत अधिक दिसून येतो. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांचं नेतृत्त्व आणि त्यांच्या धोरणांचा सायना नेहवालसारखे अनेक खेळाडू सोशल मीडियावर पुरस्कार करताना दिसतात. पण याचा अर्थ निव्वळ मोदींचा पुरस्कार हे सायना नेहवालच्या भाजप प्रवेशामागचं एकमेव कारण ठरु शकतं का? या प्रश्नाचं उत्तर नक्कीच नाही असं आहे.

फुलराणीची कमळाला साथ! बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश


सायना नेहवाल किंवा तिच्यासारख्या कोणत्याही दिग्गज खेळाडूचा राजकीय प्रवेश ही एक गिव्ह अँड टेक पॉलिसी असते. 29 वर्षांची सायना नेहवालची कारकीर्द आता मावळतीकडे झुकली आहे. 2012 साली लंडन ऑलिम्पिकचं कांस्यपदक मिळवणारी, 2015 साली जागतिक बॅडमिंटनचं रौप्य आणि 2017 साली जागतिक बॅडमिंटनचं कांस्यपदक जिंकणारी सायना नेहवाल आता पुन्हा तरुण होणार नाही. त्यात तिच्या पाठीशी दुखापतीचा ससेमिराही पुन्हा लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च स्तरावर खेळण्यासाठीचा फिटनेस राखणं सायनासाठी नक्कीच सोपं नाही. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्त होण्याआधीच तिने सक्रिय राजकारणात पदार्पण करुन आपल्या कारकीर्दीची गाडी वरच्या गिअरमध्ये टाकली. सायनासारख्या कर्तबगार महिलेने राजकारणात मोठं होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली, तर ती अजिबात चुकीची नाही.

सायना नेहवालचं राजकारणातलं पदार्पण भाजपच्याही पथ्यावर पडावं. एक खेळाडू म्हणून तिच्या नावाला मोठं वलय आहे. त्यामुळे सायना नेहवाल या नावाला देशभरात अपीलही आहे. साहजिकच दिल्ली विधानसभा निवडणुकीत सायना नेहवाल भाजपसाठी प्रचाराच्या रणधुमाळीत उतरली तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. मूळची हरयाणवी असलेली सायना ही हैदराबादमध्ये लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे सायनाच्या भाजप प्रवेशाने पक्षाचा हरयाणा आणि तेलंगणा या दोन राज्यांमधला जनाधार वाढू शकतो. सायना नेहवालच्या भाजपप्रवेशामागचं हेच खरं गणित आहे.