जालना : पुण्याचा अभिजीत कटके की बुलडाण्याचा बाला रफिक शेख 'महाराष्ट्र केसरी' होणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील कुस्तीशौकिनांना लागली आहे. जालन्याच्या आझाद मैदानात आज सायंकाळी या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल.
अभिजीत कटके आणि बाला रफिक यांच्या वयात चार वर्षांचं अंतर आहे. अभिजीत 22 वर्षांचा, तर बाला रफिक 26 वर्षांचा आहे. पण या वयातही त्या दोघांनी भारताच्या कुस्तीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिजीत कटके हा मॅटवरचा मातब्बर पैलवान बनलाय. तो सलग तिसऱ्यांदा मॅट विभागाची फायनल जिंकून, महाराष्ट्र केसरी किताबाच्या कुस्तीसाठी पात्र ठरलाय.
बाला रफिकनं मैदानी कुस्तीचा हीरो म्हणून महाराष्ट्रासह उत्तरेतही आपला ठसा उमटवलाय. त्यानं माती विभागाची फायनल जिंकून, पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीसाठी लढण्याचा मान मिळवला आहे.
अभिजीतचं वजन या घडीला तब्बल 120 किलो आहे, त्या तुलनेत बाला रफिकचा वजन काटा हा 124 किलोचा आकडा दाखवतो. अभिजीतची उंची पाच फूट ११ इंच आहे, तर बाला रफिक सहा फूट तीन इंच उंच आहे. अभिजीत हा पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पठ्ठ्या आहे, तर बाला रफिक हा सध्या पुण्याच्याच हनुमान आखाड्याचा पैलवान आहे. याआधी त्यानं कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीत हिंदकेसरी गणपत आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीची बाराखडी गिरवली होती.
अभिजीतला अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाड यांच्यासज्ञ जॉर्जियाच्या प्रशिक्षकांचंही मार्गदर्शन लाभलं आहे. बाला रफिक हा मूळचा गणपत आंदळकरांचा पठ्ठ्या आहे. पुण्याच्या हनुमान आखाड्यात गणेश दांगट, गणेश घुले आणि गोरख वांजळे ही त्याची सध्या वस्ताद मंडळी आहेत.
अभिजीतनं 2015 साली युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता. 2016 साली त्यानं ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत कांस्यपदकाचा मान मिळवला होता. अभिजीतला गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरीत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. मग जमखंडीतल्या भारत केसरी किताबानं त्याचा आत्मविश्वास आणखी उंचावला. त्या आत्मविश्वासानं अभिजीतला २०१७ सालचा महाराष्ट्र केसरी मिळवून दिला. त्यानं ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत सुवर्ण आणि सीनियर राष्ट्रीय कुस्तीत रौप्यपदकाची कमाई केली.
बाला रफिकनं गेल्या काही वर्षांत गावोगावची कुस्ती मैदानं जिंकून आपल्या गाठीशी प्रचंड अनुभव बांधून घेतला आहे.
वयाच्या बाविशीतही अभिजीत एक परिपक्व पैलवान म्हणून ओळखला जातो. त्याचा बचाव आधीपासूनच भक्कम होता. पण आता त्याच्या आक्रमणालाही धार चढल्याचं दिसून येत आहे. वयाच्या बाविशीतही तो भलताच परिपक्व झालाय. तो आक्रमक तर आधीपासूनच आहे. पण समोरचा प्रतिस्पर्धी पाहून रणनीती आखण्यात आणि प्रतिस्पर्ध्याचा डाव त्याच्यावरच उलटवण्यातही बाला रफिक माहिर आहे.
महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती ही मॅटवर होत असल्याचा फायदा अभिजीतला होईल, असा त्याच्या चाहत्यांचा दावा आहे. बाला रफिकचे चाहते तो दावा खोडून काढतात. बाला रफिक हा मॅटवरही तितक्याच ताकदीनं खेळतो, अशी साक्ष त्याचे चाहते देतात. त्यामुळं त्या दोघांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती कोण जिंकणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.