पुणे : यशासोबतच अपयशाचंही श्रेय घेण्याची वृत्ती नेतृत्वात असली पाहिजे. जोपर्यंत नेतृत्व अपयशाचं श्रेय घेणार नाही, तोपर्यंत संस्थेबद्दलची त्यांची निष्ठा आणि कटिबद्धता सिद्ध होत नाही, असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.
तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर गडकरींनी हे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेडतर्फे उत्कृष्ट काम करणाऱ्या नागरी बँकांचा गौरव करण्यात आला, त्यावेळी गडकरी बोलत होते. चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी सरकारनं उभं राहिलं पाहिजे, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. तसेच वाईट काम करणारा कोणत्याही पक्षाचा असेल तरी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असं गडकरी म्हणाले.
सहकार चळवळ वाढवण्यासाठी राजकारण दूर ठेवणं गरजेचं असल्याचं गडकरींनी यावेळी सांगितलं. "राजकारण सहकारामधून बाहेर असावं. जे पॅनेल हरतं ते दुसऱ्याविरुद्ध निवेदन देतं, मग चौकशी सुरु होते. भाजपचं राज्य आलं की काँग्रेस विरुद्ध चौकशी आणि काँग्रेसचं राज्य आलं की भाजप विरुद्ध चौकशी होते. मात्र ज्या संस्था चांगलं काम करतात त्यांना त्रास देऊ नये, असा सल्लाही गडकरींनी दिला.