फ्रान्सच्या अॅन्टॉईन ग्रिझमनचा गोल आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधला आजवरचा ऐतिहासिक गोल ठरलाय. ग्रिझमनचा हा गोल ऐतिहासिक ठरण्याचं कारण आहे त्यासाठी वापरण्यात आलेली व्हीएआर म्हणजे व्हिडीओ असिस्टंट रेफरी प्रणाली.


फ्रान्सच्या अॅन्टॉईन ग्रिझमनच्या या ऐतिहासिक गोलची नोंद ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ रिसडननं ग्रिझमनला पेनल्टी क्षेत्रात पाडलं. पण रेफरी आंद्रे कुन्हा यांनी फ्रान्सला पेनल्टी दिली नाही. रेफरीच्या त्या निर्णयावर फ्रान्सनं दाद मागून रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. व्हीआर प्रणालीनुसार रिव्ह्यूमध्ये रिसडननं ग्रिझमनला जाणूनबुजून पाडल्याचं सिद्ध झालं. त्यामुळं फ्रान्सला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्याच पेनल्टीवर ग्रिझमननं गोल करून एक ऐतिहासिक नोंद केली. व्हीएआर प्रणालीचा वापर करून घेण्यात आलेल्या रिव्ह्यूनंतर नोंद झालेला तो पहिला गोल ठरला.


काय आहे ही व्हीआर प्रणाली?

व्हीएआर म्हणजेच व्हिडीओ असिस्टंट रेफरी प्रणाली. यंदाच्या फिफा विश्वचषकात पहिल्यांदाच या प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे सामन्यादरम्यान रेफरीनं दिलेल्या चार निर्णयांविरोधात दाद मागता येईल म्हणजे रिव्ह्यू घेता येईल. त्यात गोल, पेनल्टी, रेड कार्ड आणि खेळाडूंची ओळख पटवण्यासाठी या प्रणालीचा वापर करता येतो.

या प्रणालीचा वापर कसा करण्यात येईल?

एखाद्या संघानं सामन्यादरम्यान रिव्ह्यू मागितल्यास मैदानावरील रेफरी व्हीएआर पॅनेलकडे हा निर्णय सोपवतो. व्हीएआर पॅनेलमध्ये मुख्य रेफरी आणि तीन सहाय्यक रेफरींचा समावेश असतो. या रेफरींकडून सामन्यादरम्यानच्या त्या घटनेचं फुटेज तपासण्यात येतं. त्यानंतर हे फुटेज मैदानावर असलेल्या एका स्क्रीनवर मैदानावरच्या मुख्य रेफरीला दाखवण्यात येतं. त्यानंतर मुख्य रेफ्री योग्य तो निर्णय घेतो. याशिवाय मैदानावरील रेफरीच्या नजरेतून एखादी घटना सुटल्यास व्हीएआर रेफरीकडून मुख्य रेफरीला मायक्रोफोनवर तशा सूचना दिल्या जातात. व्हीएआर पॅनेलकडून मिळालेल्या या सूचनांनुसार मैदानावरील रेफरी अधिकृतरित्या रिव्ह्यू घेऊ शकतो.

फिफानं सगळ्यात आधी व्हीएआर प्रणालीचा वापर 2017 सालच्या कॉन्फेडरेशन कपमध्ये केला होता. त्यानंतर रशियात होत असलेल्या फिफा विश्वचषकातही या प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आजचा जमाना हा तंत्रज्ञानाचा आहे. त्यामुळं सध्या खेळांच्या दुनियेत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसत आहे. क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन आणि कबड्डीसारख्या खेळातही ही रिव्ह्यू प्रणाली मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरानं खेळातली पारदर्शकता वाढणार असेल किंवा पंचमंडळींकडून होणाऱ्या मानवी चुका टाळता येणार असतील, तर तंत्रज्ञानाचा वापर करायलाच हवा.