त्यानंतरच्या काळात व्हॅसलिनची जागा कधी माती, कधी नखं, तर कधी तोंडातल्या लाळेनं घेतली. केपटाऊन कसोटीत तर ऑस्ट्रेलियानं अखिलाडूपणाचा कळस गाठला. ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्त्वगटाचं ते संघटित कारस्थान होतं. त्यानिमित्तानं सॅण्डपेपरनं केलेलं बॉल टॅम्परिंग समोर आलं.
ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टच्या केपटाऊन कसोटीतल्या याच कपट कारस्थानानं क्रिकेटविश्वात सध्या मोठं वादळ उठलंय. क्रिकेटच्या परिभाषेत यालाच म्हणतात. बॉल टॅम्परिंग. चेंडू अवैधरित्या हाताळणं.
केपटाऊन कसोटीतल्या या बॉल टॅम्परिंग प्रकरणात एकटा कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट हा गुन्हेगार म्हणून समोर आला. पण वास्तवात ही ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्त्वगटाची संघटित गुन्हेगारी होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनंच तशी कबुली दिली आणि साऱ्या क्रिकेटविश्वावर जणू वीज कोसळली.
स्मिथ आणि वॉर्नरचं आधीच ठरलं होतं, बॉल टेम्पर करायचा!
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात बॉल टॅम्परिंगची ही काही पहिलीच घटना नव्हती. पण ऑस्ट्रेलियासारख्या टॉपच्या टीमचा नेतृत्त्वगट बॉल टॅम्परिंगसारखं अखिलाडूपणाचं कारस्थान रचतो.. तीही डझनावारी टेलिव्हिजन कॅमेऱ्यांच्या जगात.. त्यामुळं कांगारूंची कपटनीती साऱ्या जगालाच हादरवणारी ठरली.
बॉल टॅम्परिंग म्हणजे काय?
बॉल टॅम्परिंग या क्रिकेटिंग टर्मचा मराठीत चेंडू अवैधरित्या हाताळणं असा सोपा अनुवाद आपल्याला करता येईल. पण चेंडू अवैधरित्या हाताळणं यात अनेक गैरप्रकारांचा समावेश होतो. सांगायचंच झालं तर मातीनं, बाटलीच्या बुचानं किंवा कोणत्याही चीजवस्तूनं चेंडू जाणीवपूर्वक घासणं, चेंडूची शिवण दातांनी किंवा नखांनी उसवणं, चेंडूंवर दातांनी किंवा नखांनी ओरखडे पाडणं, मिन्ट किंवा च्युईंगगम चघळून तोंडात निर्माण होणाऱ्या लाळेनं चेंडूच्या एका बाजूची लकाकी राखणं, व्हॅसेलिन किंवा तत्सम पदार्थ लावून चेंडूच्या एका बाजूची लकाकी राखणं या साऱ्या बाबी बॉल टॅम्परिंगमध्ये मोडतात.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात असं बॉल टॅम्परिंग वारंवार पाहायला मिळालंय.
जानेवारी १९७७, चेन्नई कसोटी
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन लिव्हरनं चेंडूची लकाकी राखण्यासाठी व्हॅसेलिन वापरल्याचा आरोप पंच जुडा रुबेन यांनी केला होता. या प्रकरणात इंग्लंड क्रिकेट बोर्डानं लिव्हरवर कोणतीही कारवाई न करता त्याला सोडून दिलं होतं.
जुलै १९९४, लॉर्डस कसोटी
इंग्लंडचा मायकल आथरटन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत खिशातून माती काढून चेंडूची एक बाजू घासताना रंगेहाथ पकडला गेला होता. या प्रकरणात त्याला मानधनाच्या पन्नास टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला होता.
नोव्हेंबर २००१, पोर्ट एलिझाबेथ कसोटी
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या या कसोटीत सचिन तेंडुलकर नखांनी शिवणीतली माती काढताना आढळून आला होता. या प्रकरणात सामनाधिकाऱ्यांनी त्याला एक सामन्याच्या बंदीची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेला भारतीय संघानं घेतलेल्या आक्षेपाच्या पार्श्वभूमीवर सचिनवरचा बॉल टॅम्परिंगचा गंभीर आरोप मागे घेऊन, त्यानं चेंडू स्वच्छ करण्यासाठी पंचांची परवानगी घेतली नसल्याचा सौम्य आरोप ठेवण्यात आला.
जानेवारी २००४, ब्रिस्बेन वन डे
झिम्ब्बावेविरुद्धच्या या वन डेत राहुल द्रविडनं चेंडूची लकाकी राखण्यासाठी तोंडातल्या मिंटची लाळ वापरल्याचं आढळून आलं होतं. या प्रकरणी द्रविडला मानधनाच्या पन्नास टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला होता.
ऑगस्ट २००६, ओव्हल कसोटी
इंग्लंडमधल्या या कसोटीत पंचांनी पाकिस्तानी गोलंदाजांवर बॉल टॅम्परिंगचा आरोप ठेवून, तो चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. तसंच इंग्लंडला पाच बोनसगुण बहाल केले. पंचांच्या निर्णयाचा निषेध म्हणून पाकिस्ताननं चहापानानंतर संघच मैदानात उतरवला नाही. परिणामी पंचांनी ही कसोटी इंग्लंडला बहाल केली.
जानेवारी २०१०, पर्थ वन डे
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या या वन डेत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी चेंडूचा चावा घेऊन, तो खराब करत असल्याचं आढळून आलं होतं. या प्रकरणी आफ्रिदीवर दोन वन डे सामन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
ऑक्टोबर २०१३, दुबई कसोटी
पाकिस्तानविरुद्धच्या या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा फॅफ ड्यू प्लेसी खिशाजवळच्या झिपवर चेंडू घासून तो खराब करत असल्याचं आढळून आलं होतं. या प्रकरणी ड्यू प्लेसीला मानधनाच्या पन्नास टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला होता.
नोव्हेंबर २०१६, होबार्ट कसोटी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा फॅफ ड्यू प्लेसी मिन्टची लाळ चोळून चेंडूची लकाकी राखण्याचा प्रयत्न करताना आढळला होता. या प्रकरणात त्याला मानधनाच्या शंभर टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला.
एकंदरीत काय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या बॉल टॅम्परिंगच्या प्रकरणांमध्ये आजवर एखादाच खेळाडू कळत किंवा नकळत दोषी म्हणून समोर आला होता. पण केपटाऊन कसोटीनं पहिल्यांदाच बॉल टॅम्परिंग अख्ख्या टीमचं कटकारस्थान म्हणून समोर आलं. तरीही आयसीसीनं कर्णधार स्टीव्ह स्मिथला केवळ एकाच कसोटी सामन्याच्या बंदीची शिक्षा ठोठावून कांगारूंच्या कपटनीतीला वेळीच ठेचण्याची संधी मात्र गमावली.
संबंधित बातम्या