नवी दिल्ली : अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी आयपीएलला हजेरी लावल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला, मात्र आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी कूक यांच्यासाठी जणू पायघड्या घातलेल्या पाहून आयपीएलचे टायटल स्पॉन्सर्स नाराज असल्याचं चित्र आहे.
कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर गुजरात लायन्स आणि कोलकाता नाईट रायडर्समधील एका सामन्याला कूकनं राजीव शुक्लांसोबत हजेरी लावली होती. त्यानंतर आयपीएलची टायटल स्पॉन्सर आणि अॅपलची प्रतिस्पर्धी असलेल्या विवो या चीनच्या कंपनीनं आपली नाराजी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांकडे बोलून दाखवल्याचीही चर्चा आहे. बीसीसीआयकडून मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
'व्हिवोकडून अद्याप कोणतंही पत्र आलेलं नाही. तक्रार आल्यास आम्ही या प्रकरणात लक्ष घालू. हे प्रकरण घडलं त्यावेळी मी पदावर नव्हतो' असं बीसीसीआयचे नवनिर्वाचित सचिव अजय शिर्केंनी म्हटल्याचं 'मुंबई मिरर'ने सांगितलं आहे.
स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पेप्सीनं गेल्या वर्षी आयपीएलसोबतचा करार पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंर विवोनं आयपीएलच्या स्पॉन्सरशिपचे हक्क मिळवले होते.