मुंबई : मित्रपक्षांना सरकारमध्ये संधी देण्यासाठी जून महिन्यात राज्यातील मत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. विस्तारानंतर मंत्रिमंडळात सदाभाऊ खोत, विनायक मेटे, महादेव जानकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, तर रामदास आठवलेंची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागू शकते.

 
याशिवाय राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात 10 नवीन मंत्र्याचा समावेश होण्याचे संकेत आहेत. याआधी अनेदा मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल सांगण्यात आलं, मात्र हा विस्तार लांबणीवर पडत गेला. मात्र आता जून महिन्यात हा विस्तार प्रत्यक्षात होणार असल्याचं समजतं.

 
दुसरीकडे, 10 जूनला होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारांची नाव निश्चित करायला सुरुवात केली आहे. भाजप विधानपरिषदेच्या 2 जागा मित्र पक्षांना सोडणार असून, त्या जागांवर सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांची वर्णी लागण्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडून मिळते.

 
दरम्यान भाजप विधानपरिषदेच्या 3 जागा लढवणार आहे. त्यासाठी मनोज कोटक, सुरजितसिंह ठाकूर, रघुनाथ कुलकर्णी आणि माधव भंडारी यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिवसेनेकडून संजय राऊत हे राज्यसभेसाठी आज अर्ज भरणार आहेत, तर सुभाष देसाई आणि दिवाकर रावते हे विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.