पुणे : भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमांमध्ये आणखी एका विक्रमाची भर पडली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विराटने कर्णधार म्हणून आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. विराटने कर्णधार म्हणून सर्वात जलद 11 हजारांचा टप्पा पार केला आहे. याबाबतीत विराटने महेंद्रसिंह धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगलाही मागे टाकलं आहे.


विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 1 धाव काढून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावा पूर्ण केल्या. विराट कोहली अशी कामगिरी करणारा जगातला सहावा आणि भारताचा दुसरा कर्णधार बनला आहे. याआधी भारताकडून महेंद्रसिंह धोनीने अशी कामगिरी केली आहे. विराट कोहलीसह आता रिकी पॉटिंग, ग्रॅम स्मिथ, महेंद्रसिंह धोनी, अॅलन बॉर्डर, स्टीफन फ्लेमिंग यांचा या यादीत समावेश आहे.


विराट कोहलीने 196 डावांमध्ये 11 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंगने 252 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथने 264 डावांमध्ये 11 हजार धाव पूर्ण केल्या होत्या. तर अॅलन बॉर्डरने 316 आणि महेंद्रसिंह धोनीने 324 डावांमध्ये 11 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.


टीम इंडियाने पुण्यातील ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात श्रीलंकेचा 78 धावांनी धुव्वा उडवला. तीन सामन्यांची मालिकाही 2-0 अशी जिंकली. या सामन्यात भारताने दिलेलं 202 धावांचं आव्हान श्रीलंकेला पेलवलं नाही. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा अख्खा डाव 123 धावांत गुंडाळला. भारताकडून नवदीप सैनीनं तीन, शार्दूल ठाकूरनं दोन आणि वॉशिंग्टन सुंदरनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी सलामीच्या लोकेश राहुल आणि शिखर धवनच्या अर्धशतकांचा मोलाचा वाटा होता. त्या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. तर मनिष पांडेने 31 आणि विराटने 26 धावांच योगदान दिलं.


संबंधित बातम्या