मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या रेकॉर्ड बूकमध्ये आणखी एका रेकॉर्डची भर पडली आहे. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 34 धावांची मॅच विनिंग खेळी केली. यावेळी विराटने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत रोहित शर्माला मागे टाकलं, तर कर्णधार म्हणून 1000 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. कर्णधार म्हणून विराटने सर्वात कमी सामन्यात 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.


टीम इंडियाचा कर्णधार म्हणून टी-20 सामन्यात 1000 धावा पूर्ण करणारा विराट दुसरा तर कर्णधार म्हणून सहावा खेळाडू ठरला  आहे. याआधी भारताकडून महेंद्रसिंह धोनीनी ही कामगिरी केली आहे. कर्णधार म्हणून धोनीच्या नावे 72 सामन्यात 37.06 च्या सरासरीने 1112 धावा आहेत. तर विराटच्या नावे 32 सामन्यात 1006 धावा आहेत.


कोहलीच्या सर्वात जलद 1000 धावा


कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसला यामध्ये मागे टाकलं आहे. फाफ डू प्लेसिसने 31 डावांमध्ये हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तर विराट कोहलीने अवघ्या 30 डावांमध्ये हजार धावांचा टप्पा पार केला आहे.


विराट कोहली (भारत)- 30 डाव
फाफ डू प्लेसिस (दक्षिण अफ्रिका)- 31 डाव
केन विलियम्सन (न्यूझीलंड)- 36 डाव
इयान मोर्गन (इंग्लंड)- 42 डाव
विलियम पिटरफिल्ड (आयर्लंड)- 54 डावा
महेंद्रसिंह धोनी (भारत)- 57 डाव


आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे कर्णधार


कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिस अव्वल स्थानी आहे. डू प्लेसिसने 40 सामन्यात 37.44 च्या सरासरीने 1273 धावा केल्या आहेत. यामध्ये डू प्लेसिसने एक शतक आणि सात अर्धशतक झळकावली आहेत.


फाफ डू प्लेसिस (दक्षिण अफ्रुका)- 40 सामने 1273 धावा
महेंद्रसिंह धोनी (भारत)- 72 सामने 1112 धावा
केन विलियम्सन (न्यूझीलंड)- 39 सामने 1083 धावा
इयान मोर्गन (इंग्लंड)- 43 सामने 1013 धावा
विराट कोहली (भारत)- 32 सामने 1006 धावा
विलियम पोर्टरफिल्ड (आयर्लंड)- 56 सामने 1002 धावा