मुंबई : पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला स्वतःचा मुलगा म्हणून स्वीकार करण्यास नकार देणाऱ्या एका आईविरोधात मुलाने हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्या आईने आपला कायदेशीर स्वीकार करावा, तसेच आपण अडीच वर्षांचे असताना रेल्वेत सोडून देत दुसऱ्या पुरुषासोबत विवाह केल्यामुळे झालेल्या मनःस्तापाबाबत दीड कोटींची भरपाई द्यावी. अशी मागणीही या मुलाने याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.


जोगेश्वरी येथे राहणारे 40 वर्षीय श्रीकांत सबनीस हे एक मेकअप आर्टिस्ट आहेत. त्यांचे वडील दीपक सबनीस यांचा उषा पंडित नामक एका नाट्य कलावंताशी 8 एप्रिल 1978 साली विवाह झाला. त्यानंतर श्रीकांत यांचा 28 फेब्रुवारी 1979 रोजी जन्म झाला. श्रीकांत हे अडीच वर्षाचे असताना 27 सप्टेंबर 1981 रोजी त्यांच्या आईनं त्यांना डेक्कन एक्सप्रेसमध्ये सोडून दिले व उदय म्हसकर यांच्याशी पळून जाऊन दुसरा विवाह केला, असा श्रीकांत यांचा दावा आहे. कालांतराने श्रीकांत सबनीस यांचे संगोपन आधी त्यांच्या आजीने व त्यानंतर त्यांच्या मावशीने केले.


38 वर्षांनंतर साल 2017 मध्ये अचानक एके दिवशी सोशल नेटवर्किंग साईटवर त्यांना आपल्या आईचा शोध लागला. डोंबिवलीत राहणाऱ्या आपल्या आईकडे जाऊन श्रीकांत यांनी तिची भेट घेतली. त्यावेळी उषा पंडीत आणि आताच्या आरती उदय म्हसकर यांनी श्रीकांत हा आपला मुलगा असल्याचे मान्य केले. मात्र काही काळानंतर उषा यांनी श्रीकांत यांच्याशी संपर्क ठेवणे कमी केले व मुलगा म्हणून त्यांचा स्वीकार करण्यास स्पष्ट नकार दिला. आपल्या आईच्या या वागण्यामुळे मनःस्ताप झालेल्या श्रीकांत यांनी अॅड. श्याम देवानी यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.


आपल्या आईने कायदेशीररित्या आपला मुलगा म्हणून स्वीकार करावा. त्याच बरोबर आजवर झालेल्या मानसिक त्रासपोटी आपल्याला दीड कोटी रुपयांची भरपाई द्यावी. अशी मागणीही त्यांनी कोर्टाकडे केली आहे. या याचिकेवर 13 जानेवारी रोजी न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.