नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी पुन्हा शिफारस करण्यात आली आहे. बीसीसीआयचे मुख्य प्रशासक विनोद राय यांनी ही माहिती दिली.
बीसीसीआयने 2016 मध्येही विराट कोहलीची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली होती. पण त्यावेळी रिओ ऑलिम्पिक गाजवणाऱ्या पी व्ही सिंधू, साक्षी मलिक आणि दीपा कर्माकर यांना खेलरत्न पुरस्काराचा मान देण्यात आला होता.
द्रविडची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस
तर भारताच्या अंडर नाईन्टीन विश्वचषक विजेत्या संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडची बीसीसीआयने केंद्रीय क्रीडा खात्याच्या द्रोणाचार्य या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. याशिवाय भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांची ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
धवन आणि स्मृती मानधनाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
अर्जुन पुरस्कारासाठी धवन आणि स्मृतीची निवड
बीसीसीआयने सलामीचा शिखर धवन आणि महिला क्रिकेटर स्मृती मानधना यांच्या नावाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
शिखर धवन हा तिन्ही फॉरमॅट्समध्ये खेळणारा टीम इंडियाचा नियमित सलामीचा फलंदाज आहे. तर 21 वर्षांच्या स्मृती मानधनाने गेल्या वर्षीच्या महिला विश्वचषकात सातत्यपूर्ण कामगिरी बजावली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातल्या मालिकेतही तिने नऊ सामन्यांमध्ये 531 धावांचा रतीब घातला आहे.