नवी दिल्ली: देशाच्या क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांचं आज वितरण करण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज खेलरत्न, द्रोणाचार्य, अर्जुन, ध्यानचंद या पुरस्कारांचं वितरण करण्यात येईल.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना खेलरत्ननं गौरवण्यात येईल. तर महाराष्ट्राची महिला क्रिकेटर स्मृती मानधना, नेमबाज राही सरनोबतसह देशातल्या 20 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.

तर पैलवान दादू चौगुले यांनी कुस्ती प्रशिक्षक म्हणून ध्यानचंद पुरस्कारानं गौरवण्यात येईल.

दरम्यान, विराट कोहली हा 'खेलरत्न' पटकवणारा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी 1997 साली सचिन तेंडुलकर आणि 2007 साली महेंद्रसिंग धोनी यांना 'खेलरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

टीम इंडियाचा कर्णधार असलेला कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत त्याने अव्वल स्थान कायम राखलं आहे. 71 कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने 23 शतकांसह 6 हजार 147 धावा ठोकल्या आहेत. 211 वनडे सामन्यांमध्ये विराटने 35 शतकांसह 9 हजार 779 धावांचा डोंगर रचला आहे.

मीराबाईने गेल्या वर्षी 48 किलो वजनी गटात जागतिक वेटलिफ्टिंगचं, तर यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. मात्र दुखापतीमुळे एशियाडमध्ये ती चमक दाखवू शकली नाही.

महाराष्ट्राच्या लेकींना अर्जुन पुरस्कार

भारताची महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि एशियाड सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबत यांना आज अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल. स्मृती आणि राही या दोघींचा खेळ वेगवेगळा आहे, पण त्यांना जोडणारा एक दुवा आहे, तो म्हणजे त्या दोघीही मूळच्या महाराष्ट्राच्या आहेत. स्मृती सांगलीची, तर राही सरनोबत ही कोल्हापूरची आहे.

संबंधित बातम्या 

शून्य गुण असलेल्या विराटला खेलरत्न, 80 गुण मिळवूनही पुनियाला पुरस्कार नाही  

विराट कोहली, मीराबाई चानू यांना 'राजीव गांधी खेलरत्न' जाहीर