मुंबई : तो आला, तो खेळला आणि त्यानं अगदी सवयीनं विशाखापट्टणमच्या वन डेत शतकही ठोकलं. बांगलादेशचा सलामीचा फलंदाज तमिम इक्बालने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला शब्दांची सलामी दिली, त्याला अद्याप दोन दिवसही झालेले नाहीत आणि विराटने विशाखापट्टणमच्या वन डेत सवयीनुसार शतक ठोकून तमिम इक्बालच्या त्याच शब्दांवर जणू शिक्कामोर्तब केलं.

दुबईतल्या 'खलिज टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तमिम इक्बाल म्हणाला होता... विराट कोहली हा तुमच्या-आमच्यासारखा हाडामांसाचा माणूस आहे का, असा मला कधी कधी प्रश्न पडतो. तुम्हाला सांगतो, विराट फलंदाजीसाठी मैदानात उतरतो, त्यावेळचा त्याचा अविर्भावच असा असतो की तो शतक ठोकणार आहे.

विराट कोहलीने विशाखापट्टणमच्या मैदानात घेतलेली एन्ट्री तुम्ही पाहिली असेल, तर तमिम इक्बाल काय म्हणतो आहे, याची तुम्हाला कल्पना येईल. किंबहुना विराटची ती राजेशाही एन्ट्री आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासच तुम्हाला सांगतो की, तमिम इक्बालने सांगितलं त्यात तसूभरही गल्लत झालेली नाही. हा माणूस आल्या पावलीच आपल्या देहबोलीतून प्रतिस्पर्धी संघाला जणू सांगून टाकतो की, मी शतक ठोकायला मैदानात उतरलो आहे. चॅलेंज आहे तुम्हाला. मला बाद करून दाखवा.

विराट कोहलीच्या कारकीर्दीतला सध्या सोनेरी फॉर्म सुरु आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वेस्ट इंडिजचं आक्रमण दुबळं आहे, हे मान्य. पण विराटच्या दर्जाच्या फलंदाजालाही त्या आक्रमणावर चाल करून नाही, तर त्यांच्या चेंडूला योग्य तो मान देऊनच शतक ठोकायचं असतं. टीम इंडियाच्या कर्णधाराने आधी गुवाहाटीत आणि मग विशाखापट्टणमच्या मैदानात नेमकं तेच केलं.

विराट कोहलीचं विशाखापट्टणममधलं शतक हे त्याच्या वन डे कारकीर्दीतलं हे सदतिसावं शतक ठरलं. वन डेतल्या सर्वाधिक शतकांच्या शर्यतीत विराट दुसऱ्या स्थानावर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खात्यात सर्वाधिक 49 शतकं आहेत. याचा अर्थ सचिनच्या वन डेतल्या सर्वाधिक शतकांच्या विक्रमापासून विराट आता बारा शतकं दूर आहे.

सचिनच्या शतकांच्या त्या विश्वविक्रमाला गवसणी घालण्यासाठी विराटला अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण वन डे सामन्यांच्या इतिहासात दहा हजार धावांचा टप्पा सर्वात जलद ओलांडण्याचा सचिनचा विक्रम विराटने आपल्या नावावर केला. विशाखापट्टणमच्या मैदानात त्यानं 81 वी धाव घेऊन वन डेत दहा हजार धावांचा पल्ला ओलांडला.

ही कामगिरी बजावणारा विराट हा सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतरचा पाचवा भारतीय फलंदाज ठरला. विशेष म्हणजे सचिनने वन डेत 259 व्या डावात दहा हजार धावांचा पल्ला ओलांडला होता. विराटनं ती कामगिरी 205 व्या डावातच बजावली.

विराट कोहलीने मिळवलेलं यश हे त्याने स्वत:च्या फलंदाजीवर आणि फिटनेसवर घेतलेल्या मेहनतीचं फळ आहे. तमिम इक्बालने आपल्या मुलाखतीतही त्याचा उल्लेख केला आहे.

विराट कोहलीने 2008 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, त्यावेळी जाणकारांनी त्याच्या अॅटिट्यूड आणि अॅग्रेशनवर बोट ठेवलं होतं. पण 2012 सालच्या आयपीएलमध्ये आलेल्या अपयशाने विराटला धडा शिकवला. त्याने तोच अॅटिट्यूड आणि तेच अॅग्रेशन ही आपली खासियत बनवली. विराटने आपल्या आहारावर नियंत्रण आणलं. फिटनेसवर भर दिला. आता तर शंभर टक्के शाकाहाराला पसंती देऊन, त्याने खेळांच्या दुनियेतल्या दिग्गजांचा प्रयोग क्रिकेटच्या मैदानात आणला आहे. हीच प्रयोगशील वृत्ती भारतीय कर्णधाराच्या यशाचं विराट गमक ठरावं.