मुंबई : विराट कोहलीच्या टीम इंडियानं आयसीसीच्या वन डे सामन्यांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. भारतानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या वन डे सामन्यांच्या मालिकेत मिळवलेल्या चौथ्या विजयाचं हे फळ आहे. पोर्ट एलिझाबेथच्या मैदानातल्या टीम इंडियाच्या त्या विजयानं एक नवा इतिहासही घडवला.


यजुवेंद्र चहलनं मॉर्ने मॉर्कलला पायचीत केलं आणि विराट कोहलीच्या टीम इंडियानं पोर्ट एलिझाबेथच्या सेंट जॉर्जेस पार्कवर नवा इतिहास घडवला. टीम इंडियानं पोर्ट एलिझाबेथच्या वन डेसह सहा सामन्यांची मालिका 4-1 अशी खिशात घातली. भारतानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जिंकलेली ही वन डे सामन्यांची पहिलीवहिली मालिका ठरली.

टीम इंडियानं याआधी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चार वन डे सामन्यांच्या मालिकेत सहभाग घेतला होता. 1992-93 साली भारतानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली सात वन डे सामन्यांची मालिका 2-5 अशी गमावली. मग 2006-07 साली पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारतानं यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर 0-4 असं लोटांगण घातलं.

2010-11 साली पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारतानं दक्षिण आफ्रिकेकडून 2-3 अशी निसटती हार स्वीकारली. 2013-14 सालच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताला तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता.

भारतीय खेळपट्ट्यांच्या तुलनेत अधिक वेगवान आणि बाऊन्सी खेळपट्ट्या हे टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेतल्या वन डे सामन्यांमधल्या अपयशाचं कारण होतं. त्या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजी अडचणीत यायची. पण विद्यमान दौऱ्यातल्या वन डे सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजीचं चित्र सुदृढ दिसलं. विराट कोहलीनं कर्णधारास साजेशी कामगिरी बजावली. त्यानं आघाडीवर राहून भारतीय फलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली.

विराटनं पाच सामन्यांमध्ये मिळून 429 धावांचा रतीब घातला. त्यात दोन शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. सलामीच्या शिखर धवननं वन डे सामन्यांच्या मालिकेत सातत्यानं धावा केल्या आहेत. धवननं पाच सामन्यांमध्ये 305 धावा फटकावल्या आहेत. त्यानं एक शतक आणि दोन अर्धशतकं साजरी केली.

दक्षिण आफ्रिकेच्या या दौऱ्यात रोहित शर्मावर खरं तर धावा रुसल्या होत्या. पण पोर्ट एलिझाबेथच्या वन डेत त्यानं शतक झळकावून धावांचा उपवास सोडला. रोहितच्या याच शतकानं भारताला पाचव्या वन डेसह मालिकाही जिंकून दिली.

कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलचा मनगटी हिसका हेही दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या भारताच्या वन डे मालिकाविजयाचं गमक ठरलं. दक्षिण आफ्रिकी फलंदाजांनी कसोटी मालिकेत भारताच्या भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमीसमोर वारंवार शरणागती स्वीकारली होती. मग वन डे सामन्यांमध्ये कुलदीपचा चायनामन आणि चहलचा लेग स्पिन दक्षिण आफ्रिकी फलंदाजांच्या पचनी पडला नाही.

कुलदीप यादवनं पाच सामन्यांमध्ये अवघ्या 185 धावा मोजून 16 फलंदाजांना माघारी धाडलं. त्याची 23 धावांत चार विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यजुवेंद्र चहलनं पाच सामन्यांमध्ये 224 धावा मोजून 14 विकेट्स काढल्या. त्याची 22 धावांत पाच विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी वन डे सामन्यांमध्ये बजावलेल्या कामगिरीनं टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ऐतिहासिक मालिकाविजय मिळवून दिलाच, पण मालिकाविजयासह भारतानं आयसीसीच्या वन डे क्रमवारीतही अव्वल स्थानावर झेप घेतली. त्यामुळे आयसीसीच्या कसोटी आणि वन डे क्रमवारीत टीम इंडिया एकाचवेळी नंबर वन आहे. कर्णधार विराट कोहलीसाठी ही नक्कीच अभिमानाची बाब ठरावी.

संबंधित बातम्या :


शतकानंतर रोहित शर्माचं पत्नीला खास व्हॅलेंटाईन गिफ्ट


... म्हणून शतकानंतरही सेलिब्रेशन न करता शांत होतो : रोहित शर्मा


मालिका विजयानंतर विराटचं द. आफ्रिकेला 'अखेरचं आव्हान'


भारताकडून मायदेशात पराभव, द. आफ्रिकेला विश्वचषकाची चिंता


धवनची विकेट सेलिब्रेट करणं रबाडाला महागात, आयसीसीची कारवाई


VIDEO : सामन्याला कलाटणी देणारा पंड्याचा भन्नाट 'थ्रो'


धोनीने घेतलेला DRS निर्णय चुकला, सोशल मीडियावर ट्रोल


भारताने द. आफ्रिकेत वाईट इतिहास पुसत नवा इतिहास रचला


भारताने इतिहास रचला, द. आफ्रिकेत पहिल्यांदाच मालिका विजय