फ्लोरिडा : शाळेतील गोळीबाराच्या घटनेमुळे अमेरिका पुन्हा एकदा हादरली आहे. फ्लोरिडात माजी विद्यार्थ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 17 निष्पाप चिमुरड्यांना जीव गमवावा लागला. या प्रकरणी 19 वर्षीय आरोपी निकोलस क्रूझला अटक करण्यात आली आहे.


फ्लोरिडातील पार्कलँड परिसरात असलेल्या स्टोनमन डग्लास हायस्कूलमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. गैरवर्तनामुळे निकोलस क्रूझला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्याच रागातून त्याने शाळेत घुसून गोळीबार केल्याची माहिती आहे.

आरोपी निकोलसने सुरुवातीला फायर अलार्म वाजवला. त्यामुळे आग लागल्याच्या भीतीने विद्यार्थ्यांची पळापळ झाली. या परिस्थितीचा फायदा घेऊन त्याने अंदाधुंद गोळीबार केला.

आरोपीने गॅस मास्क लावला होता आणि त्याच्याकडे स्मोक ग्रेनेड होते, अशी माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिली. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला शिताफीने पकडण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं.

शाळेत गोळीबार होत असल्याचं समजताच विद्यार्थ्यांचे प्राण वाचवण्यासाठी आपण 19 विद्यार्थ्यांना कपाटात लपवल्याचं एका शिक्षिकेने सांगितलं.

स्टोनमन डग्लास हायस्कूलमध्ये भारतीय वंशाचे अमेरिकन विद्यार्थीही शिकत असल्याची माहिती आहे. त्यापैकी एक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मयत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फ्लोरिडा सरकारने ध्वज अर्ध्यावर उतरवण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन केलं आहे. स्टोनमन डग्लास हायस्कूल आठवड्याभरासाठी बंद ठेवण्यात आली आहे.


अमेरिकेत यापूर्वीही शाळा-महाविद्यालयांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. 'टाइम'च्या माहितीनुसार 2018 मध्ये शाळेत झालेल्या गोळीबाराची ही 18 वी घटना आहे. अवघ्या दीड महिन्यातच गोळीबाराच्या 18 घटना घडल्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या हाती बंदुका पडत असल्याबद्दल राष्ट्राध्यक्षपदी असताना बराक ओबामांनी चिंता व्यक्त केली होती.

गेल्या वर्षी लास वेगासमध्ये झालेल्या गोळीबारात 58 जणांना प्राण गमवावे लागले होते. तर 2016 मध्ये ओरलँडोत असलेल्या नाईट क्लबमधील गोळीबारात 49 जण मृत्युमुखी पडले होते.