बर्मिंगहॅम : भारत आणि बांगलादेश संघांमधल्या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामिवीर रोहित शर्मानं कालचा विजय 87 वर्षांच्या चारुलता पटेल यांच्या बरोबर साजरा केला आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनवर कालच्या सामन्यादरम्यान 87 वर्षांच्या चारुलता पटेल यांची उपस्थिती सर्वात लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.


विराट कोहली आणि रोहित शर्मानं सामना संपल्यानंतर चारुलताबेन यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. चारुलताबेन यांनी विराट आणि रोहितला आजीच्या ममतेनं कुरवाळत दोघांचा लाडानं मुकाही घेतला. मग विराटनं चारुलता पटेल यांचा खास उल्लेख करुन, त्यांच्यासोबतचे आपले फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Ind Vs Ban | भारताचा बांगलादेशवर 28 धावांनी विजय, उपान्त्य फेरीत एन्ट्री | विश्वचषक माझा | ABP Majha



87 वर्षांच्या चारुलताबेन या सामन्यासाठी व्हीलचेअरवरून आल्या होत्या. पण त्यांचा उत्साह हा एजबॅस्टनवरच्या तरुण चाहत्यांनाही लाजवेल असा होता. त्यांनी आपल्या दोन्ही गालांवर तिरंगा रंगवला होता. भारतीय खेळाडूंना त्या सातत्यानं प्रोत्साहन देताना दिसत होत्या. ती दृश्यं टेलिव्हिजनबरोबर  मेगास्क्रीनवरही दाखवण्यात आली.


दरम्यान टीम इंडियाने विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीत शानदार एन्ट्री घेतली आहे. बांगलादेशवर 28 धावांनी विजय मिळवत भारताने हा सामना जिंकला. बुमराहने घेतलेल्या चार, तर हार्दिक पंड्याने घेतलेल्या तीन विकेट्सच्या बळावर भारताने बांगलादेशला रोखलं. उपकर्णधार रोहित शर्माची 104 धावांची झुंजार खेळी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. रोहित शर्माला सामनावीर घोषित करण्यात आलं.

बर्मिंगहॅमच्या सामन्यात बांगलादेशला विजयासाठी 315 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय संघाने 50 षटकांत नऊ बाद 314 धावांची मजल मारली होती. त्याला उत्तर देताना बांगलादेशचा डाव 48 व्या षटकातच सर्वबाद 286 धावांवर आटोपला.