बर्मिंगहॅम : टीम इंडियाने विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीत शानदार एन्ट्री घेतली आहे. बांगलादेशवर 28 धावांनी विजय मिळवत भारताने हा सामना जिंकला. बुमराहने घेतलेल्या चार, तर हार्दिक पंड्याने घेतलेल्या तीन विकेट्सच्या बळावर भारताने बांगलादेशला रोखलं. उपकर्णधार रोहित शर्माची 104 धावांची झुंजार खेळी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. रोहित शर्माला सामनावीर घोषित करण्यात आलं.
बर्मिंगहॅमच्या सामन्यात बांगलादेशला विजयासाठी 315 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय संघाने 50 षटकांत नऊ बाद 314 धावांची मजल मारली होती. त्याला उत्तर देताना बांगलादेशचा डाव 48 व्या षटकातच सर्वबाद 286 धावांवर आटोपला.
रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या सलामीच्या जोडीने भारतीय डावाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावली. रोहित आणि राहुल यांनी 180 धावांची सलामी देऊन भारतीय डावाचा भक्कम पाया घातला होता. त्यात रोहित शर्माचा वाटा 92 चेंडूंत 104 धावांचा होता. राहुलने 77 धावांची खेळी करुन त्याला छान साथ दिली. विराट कोहलीने 26, ऋषभ पंतने 48 आणि महेंद्रसिंग धोनीने 35 धावांची खेळी करुन भारताच्या डावाला मजबुती दिली.
बांगलादेशची सुरुवात काहीशी अडखळत झाली. तमीम इकबाल 22 धावा करुन शमीच्या चेंडूवर बोल्ड झाला. त्यानंतर शाकिब आणि सौम्या सरकार यांनी बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र 33 धावा झाल्यानंतर पंड्याने सरकारची विकेट घेतली. त्यावेळी बांगलादेश 74 धावांवर होता. रहीम आणि शाकिब यांच्या 47 धावांच्या भागिदारीला चहलने ब्रेक लावला. रहीम 24 धावा ठोकून तंबूत परतला.
रोहितचं विक्रमी शतक
टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने बर्मिंगहॅममध्ये विक्रमी शतकाला गवसणी घातली. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने झळकावलेलं शतक यंदाच्या विश्वचषकातलं त्याचं चौथं तर आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतलं 26 वं शतक ठरलं. या कामगिरीसह त्याने एकाच विश्वचषकात सर्वाधिक चार शतकं झळकावण्याच्या कुमार संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी केली.
रोहित शर्माने यंदाच्या विश्वचषकात पाचशे धावांचा टप्पाही ओलांडला. विश्वचषकात पाचशे धावांचा टप्पा पार करणारा रोहित हा सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. 544 धावा ठोकत रोहित शर्मा यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
भारताचा 'षटकार'
विश्वचषकाच्या साखळी फेरीतील भारताचा हा सहावा विजय ठरला. आठ सामन्यांपैकी केवळ इंग्लंडविरुद्धचा एक सामना गमावल्यामुळे भारताच्या खात्यात 13 गुण जमा झाले आहेत. क्रमवारीत भारताने ऑस्ट्रेलियापाठोपाठ (14 गुण) दुसरं स्थान पटकावलं आहे. विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीचं तिकीट निश्चित करणारा भारता हा दुसरा संघ ठरला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारताने सातव्यांदा उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे.
भारताचा पुढचा सामना श्रीलंकेशी होणार असला, तरी केवळ औपचारिकता आहे. मात्र श्रीलंकेला उपान्त्य फेरीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे 'करो या मरो'च्या लढतीत श्रीलंका जीव ओतणार हे निश्चित.
उपान्त्य फेरीत भारताची गाठ कोणत्या संघाशी पडणार, हे लवकरच निश्चित होईल. विश्वचषकात न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेचं आव्हान अद्याप जिवंत आहे.
Ind Vs Ban | भारताचा बांगलादेशवर 28 धावांनी विजय, उपान्त्य फेरीत एन्ट्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jul 2019 05:22 AM (IST)
टीम इंडियाने विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीत शानदार एन्ट्री घेतली आहे. बांगलादेशवर 28 धावांनी विजय मिळवत भारताने हा सामना जिंकला. बुमराहने घेतलेल्या चार, तर हार्दिक पंड्याने घेतलेल्या तीन विकेट्सच्या बळावर भारताने बांगलादेशला रोखलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -