हैदराबाद : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये विजय हजारे ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. यावेळी विजय हजारे ट्रॉफीत हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि अभिषेक शर्मा यांच्यासारखे खेळाडू खेळत आहेत. आज बिहार आणि बडोदा संघात सामना झाला. या सामन्यात 13 वर्षांचा खेळाडू वैभव सूर्यवंशीनं धमाकेदार फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशी बिहार संघाकडून खेळतो. राजस्थान रॉयल्सनं 1.10 कोटी रुपयांची बोली लावत त्याला संघात घेतलं होतं. त्यानंतर तो देशभर चर्चेत आला होता.
बडोदा संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 49 ओव्हरमध्ये 277 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीनं दमदार फलंदाजी केली. त्यानं 42 बॉलमध्ये 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 71 धावा केल्या. वैभवनं 169.05 च्या स्ट्राइक रेटनं फलंदाजी केली. सलामीला उतरलेल्या वैभव सूर्यवंशीनं आक्रमक फलंदाजी केली मात्र बिहारचा संघ विजय मिळवण्यात अपयशी ठरला.
वैभव सूर्यवंशीनं रजनीश कुमार सोबत पहिल्या विकेटसाठी 40 धावांची भागिदारी केली. यानंतर महरौर याच्यासोबत 60 धावांची भागिदारी केली. बडोद्याच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 277 धावा केल्या होत्या. बडोद्याचा विकेटकीपर फलंदाज विष्णू सोळंकी यानं 102 बॉलमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह 109 धावा केल्या.
277 धावांचा पाठलाग करणाऱ्या बिहार संघाला 50 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 241 धावा करता आल्या. वैभव सूर्यवंशीनं 71 धावा केल्या. तर, साकीबुल गनीनं 43 आणि बिपीन सौरभनं 40 धावा केल्या. बिहारच्या संघाचा 36 धावांनी पराभूत झाला.
आयपीएल मेगा ऑक्शनवेळी वैभव सूर्यवंशी चर्चेत
आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये एक कोटी रुपयांची बोली लागणारा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी ठरला होता. आयपीएल 2025 साठी राजस्थान रॉयल्सनं 13 वर्षांच्या वैभवसाठी 1.10 कोटी रुपये मोजले होते.
वैभव सूर्यवंशीनं आतापर्यंतच्या करिअरमध्ये 5 प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. तीन मॅचेस लिस्ट ए मध्ये बडोदा विरुद्धची मॅच सोडून, 1 टी 20 मॅच देखील खेळली आहे. प्रथम श्रेणीतील सामन्यांमध्ये त्यानं 100 धावा केल्या आहेत.
इतर बातम्या :