पुणे: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील सूत्रधार असा ठपका असलेल्या वाल्मिक कराड यांनी मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. वाल्मिक कराड हे सीआयडीच्या कार्यालयात पोहोचण्यापूर्वी त्याठिकाणी त्यांचे कार्यकर्ते जमले होते. यानंतर एमएच 23 BG 2231 क्रमांकाच्या पांढऱ्या स्कॉर्पिओ कारमधून वाल्मिक कराड सीआयडीच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत गाडीत दोन व्यक्ती होत्या. यापैकी एका व्यक्तीने वाल्मिक कराड हे सीआयडीच्या कार्यालयात येण्यापूर्वी कुठे होते, याचा ठावठिकाणा सांगितला.


वाल्मिक कराड यांच्यासोबत गाडीतून उतरलेल्या या दोघांना प्रसारमाध्यमांनी घेरले. तुम्ही वाल्मिक कराडांसोबत कुठून आलात, कुठे होतात, असा प्रश्न यापैकी एका व्यक्तीला विचारण्यात आला. यावर संबंधित व्यक्तीने म्हटले की, आम्ही आता देवावरुन आलो, आम्ही अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मंदिरातून इकडे आलो. पण आठ दिवस वाल्मिक कराड कुठे होते, माहिती नाही. वाल्मिक कराड मला अक्ककोटच्या मंदिरात भेटले, असे या व्यक्तीने सांगितले. तर या व्यक्तीसोबत असणारा बीडमधील एक नगरसेवक गेल्या तीन दिवसांपासून वाल्मिक कराड यांच्यासोबत आहे. परवापासून वाल्मिक कराड हे पुण्यातच आहेत, असे या नगरसेवकाने सांगितले. वाल्मिक कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भीती वाटत होती, असे या नगरसेवकाने सांगितले.


वाल्मिक कराड हे मंगळवारी दुपारी 12 वाजता सीआयडीच्या कार्यालयात आले. तत्पूर्वी वाल्मिक कराड यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली. मी वाल्मीक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. सरपंच संतोष भैय्या देशमुख यांचे जे कोणी मारेकरी आहे, त्यांना अटक करावी. त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. केवळ राजकीय द्वेषापोटी या प्रकरणाशी माझे नाव जोडले जात आहे. पोलीस निष्कर्षात मी जर दोषी आढळल्यास न्यायदेवता जे काही शिक्षा देईल ते मी भोगण्यास तयार आहे, असे वाल्मिक कराड यांनी म्हटले.


सध्या पुण्यातील सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराड यांची चौकशी सुरु आहे. सीआयडीचे महासंचालक प्रशांत बोरुडे यांच्याकडून वाल्मिक कराड यांना प्रश्न विचारले जात आहेत. या चौकशीत कोणती माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.



आणखी वाचा


वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती स्कॉर्पिओ कोणाची?


23 दिवस पोलिसांना गुंगारा, शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; वाल्मिक कराडांच्या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह