Walmik Karad Surrender : बीड येथील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांची 9 डिसेंबरला खून करण्यात आला. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यावर आरोप केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र आज 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड हा पुण्यातील सीआयडीच्या (Pune CID) कार्यालयात शरण आला. तर वाल्मिक कराडसोबत आलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता धक्कादायक खुलासा केला आहे. वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण सध्या राज्यभरात चर्चेत आले आहे. या प्रकरणाचा मास्तरमाइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यानंतर वाल्मिक कराड तब्बल 22 दिवस फरार होता. मात्र, आज त्याने पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात येत आत्मसमर्पण केले. सीआयडी कार्यालयात येण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ जारी करत आली भूमिका मांडली. केज पोलीस स्टेशनमध्ये खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस, पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील, त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषाने माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे. पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी, ती मी भोगायला तयार असल्याचे त्याने म्हटले. यानंतर वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात त्याच्या खासगी गाडीने दाखल झाला. यावेळी त्याच्या गाडीतून आलेल्या कार्यकर्त्यांनी धक्कादायक खुलासा केला.
वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता
वाल्मिक कराडच्या एका कार्यकर्त्याने आम्ही आता अक्कलकोट वरून आलेलो आहोत, असे म्हटले. तर एका नगरसेवकाने वाल्मिक कराड गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातच असल्याचा खुलासा केला आहे. वाल्मिक कराडवर खोटे आरोप करण्यात आले. ते आज स्वतःहून हजर झाले आहेत. खोट्या आरोपांमुळे ते घाबरले असतील म्हणून ते पोलिसांसमोर आले नसतील, असेही या नगरसेवकाने म्हटले आहे. यामुळे वाल्मिक कराडचा शोध घेणाऱ्या पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, केज पोलीस स्टेशनला 11 डिसेंबरला वाल्मिक कराडवर दाखल झालेला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला आज वैद्यकीय तपासणीनंतर केजच्या न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा