Usman Khawaja : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK 1st Test) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियातील पर्थ या जगातील सर्वात वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर हा सामना खेळवला जाईल. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपले प्लेइंग इलेव्हन जाहीर केले असून, पुन्हा एकदा सलामीच्या फलंदाजीची जबाबदारी उस्मान ख्वाजाकडे सोपवण्यात आली आहे. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वीच उस्मानसोबत वाद निर्माण झाला आहे.
उस्मानच्या शूजने वादाची ठिणगी
उस्मान पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी मैदानावर सराव करत होता, तेव्हा कॅमेरा त्याच्या बुटावर गेला. ज्यामध्ये इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात मारल्या गेलेल्या गाझा पीडितांच्या समर्थनार्थ घोषणा लिहिली होती. उस्मानने त्याच्या बुटावर "प्रत्येकाचे जीवन समान आहे". उस्मानच्या बुटांवर लिहिलेली ही घोषणा गाझामध्ये मारल्या गेलेल्या आणि अजूनही मरत असलेल्या पीडित मुले, महिला आणि इतर निष्पाप लोकांसाठी आहे.
उस्मान ख्वाजाच्या भूमिकेनं मीडियामध्ये वाद सुरू झाला आहे. द एजमधील वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे, परंतु आयसीसीने त्यावर आक्षेप घेतला आहे आणि क्रिकेटशिवाय इतर कोणत्याही वैयक्तिक मताला मैदानाबाहेर ठेवायला हवे, असे म्हटले आहे. कोड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू सायमन ओडोनेलने या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, उस्मानने त्याच्या व्यासपीठावर आपले वैयक्तिक विचार व्यक्त केले पाहिजे, परंतु जेव्हा तो ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करत असेल तेव्हा त्याने आपले विचार लादण्याचा कोणताही अधिकार नाही.
उस्मान ख्वाजाचा यापूर्वीही गाझाला पाठिंबा
उस्मान ख्वाजाने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये गाझा पीडितांना पाठिंबा दिला होता, जेव्हा तो त्याच्या जखमी मुलीवर ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात उपचार घेत होता. उस्मानने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये आपल्या मुलीचा फोटो शेअर करताना लिहिले होते की, काही दिवसांपूर्वी माझी मुलगी आयशाला बागेत एका कीटकाच्या चाव्याने अॅलर्जी झाली होती, त्यानंतर आम्हाला आयेशावर रुग्णालयात उपचार करावे लागले. "या दवाखान्यात वीज, पाणी आणि बर्फ उपचार अशा सर्व चांगल्या व्यवस्था मिळू शकल्याबद्दल मी कृतज्ञ आहे."
आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, "माझं काळीज पिळवटून जातं, मुले यापेक्षा खूपच वाईट परिस्थितीत आहेत आणि त्यांना या सर्व सुविधा मिळू शकत नाहीत." अशा स्थितीत उस्मान पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तेच शूज घालून मैदानात उतरतो की बदलतो हे पाहावं लागेल.
इतर महत्वाच्या बातम्या