रिओ दी जनैरो : ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकांची तिहेरी हॅटट्रीक साजरी करणारा जमैकन धावपटू उसेन बोल्ट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. उसेन बोल्टने 21 ऑगस्टला वयाच्या तिसाव्या वर्षात पदार्पण केलं आणि रिओ दी जनैरोमध्येच वाढदिवस साजरा केला. एकाच रात्री तीन तरुणींसोबत बोल्टचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आणि मग जगभर बोल्टच्या या मैदानाबाहेरच्या हॅटट्रीकची चर्चा सुरु झाली.
बोल्टने नुकतंच रिओ ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर, 200 मीटर आणि फोर बाय हंड्रेड मीटर्स शर्यती जिंकून सुवर्णपदकांची हॅटट्रिक केली होती आणि सलग तीन ऑलिम्पिक्सध्ये या तीन शर्यतींचं सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. या नऊ ऑलिम्पिक पदकांबरोबरच 100 मीटर, 200 मीटर आणि फोर बाय हंड्रेड मीटर शर्यतींमधले विश्वविक्रमही बोल्टच्या नावावर जमा आहेत. त्यामुळेच बोल्टला फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ, वेगाचा राजा अशा उपाधीही मिळाल्या. रिओमध्येही बोल्टच्याच शर्यतीविषयी प्रेक्षकांमध्ये सर्वात जास्त उत्सुकता दिसून आली.
पण ऑलिम्पिकमधला हा पराक्रम ताजा असतानाच बोल्टचे हे तीन फोटोज समोर आले आहेत. हा पहिला फोटो जे डी डुराते नावाच्या ब्राझीलियन मुलीने काढला आहे. विशेष म्हणजे बोल्ट कोण आहे, याची डुरातेला कल्पना नव्हती.
दुसरा फोटो, ज्यात बोल्ट नाईट क्लबमध्ये एका मुलीसोबत डान्स करताना दिसतो. ब्राझिलियन मीडियातील वृत्तानुसार ब्राझीलचा स्टार फुटबॉलर नेमारनेही या पार्टीला हजेरी लावली होती.
तिसऱ्या फोटोत बोल्ट तिसऱ्याच एका मुलीला किस करताना दिसतो.
पार्टी टाऊन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रिओ दी जनैरोमध्ये बोल्ट रविवारी पार्टीच्या मूडमध्येच होता. याआधीही अनेकदा बोल्ट बेधुंद होऊन पार्टी करताना दिसला आहे. रिओमध्ये एका पत्रकार परिषदेतही बोल्टने ब्राझीलच्या सांबा डान्सर्ससोबत नृत्य केलं होतं.
खरंतर काही दिवसांपूर्वीच बोल्टने लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत दिले होते. तो केसी बेनेट नामक जमैकन फॅशनिस्टाशी लग्न करणार आहे. काही वर्षांपासूनच या दोघांच्या अफेयरची चर्चा सुरु आहे. बोल्टच्या या फोटोंचा त्यावर काही परिणाम होणार नाही, असा दावा करुन त्याच्या बहिणीने सारवासारव केली आहे.
विशेष म्हणजे स्वतः बोल्टने या फोटोंविषयी कुठलं स्पष्टीकरण दिलेले नाही. डान्स, मस्ती हा जमैकन संस्कृतीचा भाग आहे, असं बोल्टनं म्हटलं आहे.
बोल्टच्या जमैकाचा क्रिकेटर ख्रिस गेलकडेच पाहा. डान्स, मस्ती आणि वादांच्या बाबतीत तोही मागे नाही. मैदानावर गेलच्या फटकेबाजीनं आणि त्याच्या सेलिब्रेशनच्या स्टाईलने वेस्ट इंडीजच्या क्रिकेटमध्ये नवी उर्जा भरली. तर मैदानाबाहेर गेलने आपला रंगेलपणा कधीच लपवलेला नाही. पण या रंगेलपणामुळेच तो अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगदरम्यान टीव्ही अँकरसोबत फ्लर्टिंग केल्याने गेलला चार लाख रुपयांचा दंड भरावा लागला होता आणि माफीही मागावी लागली होती.
पण अशा वादविवादांचा गेलच्या मैदानातल्या कामगिरीवर परिणाम होताना दिसलेला नाही. गेल आणि बोल्टमधला हा एक समान दुवा म्हणायला हवा.