मुंबई : जगातल्या ऑल टाईम ग्रेट अॅथलिट्सपैकी एक असलेल्या युसेन बोल्टला कारकीर्दीतल्या अखेरच्या वैयक्तिक शर्यतीत कांस्यपदकावरच समाधान मानावं लागलं. लंडनमधल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतल्या 100 मीटर्स शर्यतीत जस्टिन गॅटलिन आणि ख्रिस्तियन कोलमननं युसेन बोल्टला पिछाडीवर टाकून अनुक्रमे सुवर्णपदक आणि रौप्यपदकाचा मान मिळवला. पण पराभवाच्या या प्रसंगातही खिलाडूवृत्तीनं वागून बोल्टनं लोकांची मनं पुन्हा जिंकली.
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतल्या शंभर मीटर्सच्या शर्यतीसाठी लंडनच्या ऑलिम्पिक स्टेडियमवर झालेली गर्दी ही निव्वळ बोल्टला जिंकताना पाहण्यासाठी आली होती. पण जस्टिन गॅटलिन आणि ख्रिस्तियन कोलमन या अमेरिकन धावपटूंनी बोल्टच्या चाहत्यांना आणि अॅथलेटिक्स रसिकांना तो आनंद मिळू दिला नाही.
जस्टिन गॅटलिननं 9.92 सेकंदांची सर्वोत्तम वेळ देऊन सुवर्णपदकाचा मान मिळवला, तर कोलमननं 9.94 सेकंदांची वेळ देऊन रौप्यपदक जिंकलं. साहजिकच या शर्यतीत 9.95 सेकंद वेळेसह बोल्टला कांस्यपदकावरच समाधान मानावं लागलं.
युसेन बोल्टची गणना ही जगातल्या ऑल टाईम ग्रेट अॅथलिट्समध्ये होते. ऑलिम्पिकची आठ सुवर्णपदकं, तर जागतिक अॅथलेटिक्सची 11 सुवर्ण आणि दोन रौप्य अशी कमाई लंडनवारीआधी त्याच्या नावावर होती.
बोल्टच्या आजवरच्या ऑन द फिल्ड जिनियस परफॉर्मन्सनं आणि ऑफ द फिल्ड जंटलमन स्वभावानंही त्याला जगभरात कमालीची लोकप्रियता मिळवून दिली आहे. त्यात त्याच्यासारख्या लोकप्रिय धावपटूनं आपल्या निवृत्तीची पूर्वकल्पना दिली. त्यामुळं त्याच्या चाहत्यांसह हजारो अॅथलेटिक्सरसिकांचीही पावलं लंडनच्या ऑलिम्पिक स्टेडियमकडे वळली होती. त्या जाणकार मंडळींना शंभर मीटर्सच्या शर्यतीत दिसलेलं दृश्य त्यांच्या पचनी पडणारं नव्हतं.
2006 ते 2010 या कालावधीत उत्तेजक सेवनप्रकरणी बंदी घालण्यात आलेला... गेल्या दोन जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावं लागलेला.. जस्टिन गॅटलिन वयाच्या चक्क पस्तिसाव्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन ठरला. ख्रिस्तियन कोलमन या अवघ्या 21 वर्षांच्या धावपटूनंही बोल्टला चकवून रौप्यपदक पटकावलं. याच कोलमननं उपांत्य फेरीतही बोल्टला हरवलं होतं.
अंतिम फेरीत गॅटलिन आणि कोलमनच्या तुलनेत बोल्टची सुरुवातच संथ झाली. याआधी त्याची सुरुवात संथ झाली, तर झपाट्यानं अंतर कापून तो प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवायचा. पण लंडनमध्ये शंभर मीटर्सचं अंतर कापताना बोल्टच्या धावण्यात नेहमीची सफाई नव्हती. त्याचं शरीर किंचित जखडलेलं वाटत होतं. तो दातओठ चावून टॉप गियर टाकण्याचा प्रयत्न करतोय, असं वाटत होतं. पण गॅटलिन आणि कोलमन यांच्या धावेत असलेली सहजता बोल्टकडे दिसली नाही. त्यामुळं बोल्टला कांस्यपदकावरच समाधान मानावं लागलं.
जस्टिन गॅटलिननं शंभर मीटर्सची ही शर्यत जिंकली तरी लोकांनी अजूनही त्याला माफ केलेलं नाही. त्यामुळं प्राथमिक फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत लोक त्याची हुर्यो उडवत होते. गॅटलिननं शर्यत जिंकली आणि त्यानं आपल्या टीकाकारांना पहिला इशारा गप्प बसण्याचा केला. पण दुसऱ्याच क्षणी त्यानं स्वत:ला सावरलं आणि गुडघ्यावर ओणवून बोल्टला मानाचा मुजरा केला. बोल्टनंही खिलाडूवत्तीनं त्याला दिलेलं आलिंगन हे त्याच्या लौकिकाला साजेसं असंच होतं.
बोल्टला त्याच्या कारकीर्दीतल्या अखेरच्या वैयक्तिक शर्यतीत हार स्वीकारावी लागली असली तरी, या एका शर्यतीतल्या पराभवानं त्या कारकीर्दीला गालबोट लागू शकणार नाही. कारण गेल्या 10-12 वर्षांत बोल्टनं जगासमोर स्वत:चा असा काही आदर्श निर्माण करून ठेवलाय, की इतरांना तिथं पोहोचण्याचा विचार करणंही कठीण आहे. त्यात आयुष्यात पराभवही कसा हसत खेळत स्वीकारायचा असतो हे दाखवून बोल्टनं आपलं मोठेपण आणखी मोठं केलं आहे.