ICC Test Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलनं आज टेस्ट क्रिकेट खेळाडूंची रॅंकिंग जाहीर केली आहे. फलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या पाच स्थानांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. तर गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिंस नंबर एक वर आहे. मात्र ऑलराऊंडर अर्थात अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये बदल झाला असून भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.   


रविंद्र जाडेजानं जेसन होल्डरला मागे सोडत ऑलराउंडरच्या यादीत टेस्ट रँकिंगमध्ये पहिलं स्थान प्राप्त केलं आहे. जाडेजा (386) आता होल्डरपेक्षा दोन गुणांनी पुढे आहे. होल्डर 384 गुणांसह दुसऱ्या स्थानी तर इंग्लंडचा ऑलराउंडर बेन स्टोक्स 377 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. भारताचा  रविचंद्रन अश्विन 353 गुणांसह अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत चौथ्या नंबरवर आहे. तर बांग्लादेशचा शाकिब अल हसन 338 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. 


IND vs NZ WTC Final Live Updates: भारताचा दुसरा डाव 170 धावांवर गुंडाळला, न्यूझीलॅंडला विजयासाठी 139 धावांची गरज


भारताचा फिरकीपटू आर अश्विन गोलंदाजांच्या यादीत  850 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे तर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिंस 908 गुणांसह एक नंबरवर आहे. न्यूझीलॅंडचा टीम साऊथी 830 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.  


फलंदाजांच्या यादीत पहिल्या पाच स्थानांमध्ये काहीही बदल झालेला नाही. भारतीय कर्णधार  विराट कोहली 814 गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहेत तर  ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 891 गुणांसह अव्वल आहे. न्यूझीलॅंडचा कर्णधार केन विलियमसन 886 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन 878 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.  इंग्लंडचा कर्णधार जो रूट  797 गुणांसह पाचव्या स्थानी आहे तर त्यानंतर भारताचा ऋषभ पंत आणि रोहित शर्मा  747 गुणांसह संयुक्तरित्या सहाव्या क्रमांकावर आहेत.