WTC 2021, 2 Innings Highlight:  जागतिक कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा रोमांच शिगेला पोहोचला आहे. राखीव दिवस रंगतदार अवस्थेत आहे. भारताचा दुसरा डाव 170 धावांवर गुंडाळला गेल्यानं न्यूझीलँडला 139 धावांचं आव्हान मिळालं आहे. न्यूझीलँडच्या गोलंदाजांच्या वादळासमोर भारतीय फलंदाज टिकू शकले नाही.  साऊदी, बोल्टच्या दमदार गोलंदाजीमुळे भारताचा दुसरा डाव 73 षटकात 170 धावांवर आटोपला. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली.  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मिळवण्यासाठी न्यूझीलँडला 53 षटकात 139 धावांची आवश्यकता आहे तर भारताला 10 विकेट्सची गरज आहे. 


दुसऱ्या डावातही फलंदाजांनी टाकल्या नांग्या
कालच्या 2 बाद 64 धावांवरून पुढे खेळणाऱ्या भारताने उपाहारापर्यंत अर्धा संघ बाद झाला. विराट कोहली (13), चेतेश्वर पुजारा (15) आणि अजिंक्य रहाणेला (15) धावांवर बाद झाले. त्यानंतर ऋषभ पंतने टीम इंडियाचा डाव सांभाळला. पंतसोबत खेळपट्टीवर स्थिरावलेला रवींद्र जाडेजा 16  धावांवर बाद झाला. तर 70व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या नादात ऋषभ पंत 41 धावांवर  बाद झाला. पंतनंतर अश्विनही तग धरु शकला नाही. बोल्टने त्याला टेलरकरवी झेलबाद केले. त्यानंतर भारताचे तळाचे फलंदाजही स्वस्तात बाद झाले. न्यूझीलॅंडकडून दुसऱ्या डावात टिम साऊदीने 48 धावांत 4 विकेट घेतल्या तर  बोल्टने 3, जेमीसनने 2 तर नील वॅगनरने 1 विकेट घेतली. 


WTC Final Updates: सामना रोमांचक स्थितीत, पण जर मॅच 'ड्रॉ' झाली तर काय? 'असा' ठरणार कसोटी विश्वविजेता


भारताचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला होता. पहिल्या डावात अजिंक्य रहाणे 49 तर विराट कोहली 44 धावा केल्या होत्या. काईल जेमीसन भारताचे पाच गडी बाद केले होते. त्यानंतर न्यूझीलॅंजचा पहिला डाव 249 वर आटोपला होता. न्यूझीलॅंडकडून डेव्हॉन कॉन्वे 54, केन विल्यमसन 49 धावा केल्या होत्या. मोहम्मद शमीनं चार तर इशांत शर्माने 3, अश्विननं दोन विकेट घेतल्या होत्या. 


कसोटी अनिर्णीत राहिली तर काय


आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने या सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन्सची घोषणा केली आधीच केली आहे. त्यानुसार ही कसोटी अनिर्णीत राहिली किंवा 'टाय' झाली तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येणार आहेत.  या फायनलसाठी आयसीसीने राखीव दिवसाचाही घोषणा केली होती. अपेक्षेप्रमाणे पाऊस आल्यानं पहिल्या दिवसाचा खेळ होऊ न शकल्यानं आजच्या 23 जून राखीव दिवशीही सामना सुरु आहे.