विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्याचं भारतीय संघाचं स्वप्न अखेरीस भंगलं. भारताने विजयासाठी दिलेलं 178 धावांचं आव्हान बांगलादेशने संयमी खेळी करत पूर्ण केलं. भारताकडून रवी बिश्नोई आणि सुशांत मिश्राने गोलंदाजीत प्रयत्नांची पराकाष्टा केली, मात्र ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
परवेझ हुसैन इमॉन आणि तांझिद हसन या जोडीने बांगलादेशला चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र बिश्नोई आणि सुशांत मिश्राने बांगलादेशच्या डावाला खिंडार पाडत भारताची बाजू मजबूत केली होती. मात्रपरवेझ हुसैन इमॉन आणि कर्णधार अकबर अलीच्या संयमी खेळीने संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून रवी बिश्नोईने चार विकेट घेतल्या.
यंग टीम इंडियाचा बिनीचा शिलेदार, पाणीपुरी विकणाऱ्या मुलाची 'यशस्वी' वाटचाल
त्याआधी, अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सलामीचा यशस्वी जैस्वाल भारतीय डावाचा नायक ठरला. त्याच्या झुंजार खेळीनं भारताला सर्व बाद 177 धावांची मजल मारून दिली. अविशेक दास, शोरिफुल इस्लाम यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताला 177 धावांवर रोखण्यात बांगलादेशला यश आलं आहे. नाणेफेक जिंकत बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली.
यशस्वीनं 121 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह 88 धावांची खेळी उभारली. तिलक वर्मानं 65 चेंडूंत तीन चौकारांसह 38 धावांची खेळी केली. त्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी रचली. भारताच्या डावातली ती एकमेव भागीदारी ठरली. सलामीच्या यशस्वी जैस्वालचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांनी अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या फायनलमध्ये लोटांगण घातलं. बांगलादेशकडून अविशेक दासने 3, हसन शाकीब आणि शोरिफुल इस्लामने प्रत्येकी 2-2 तर रकीब उल-हसनने एक विकेट घेतली.