मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर फलंदाजीसाठी पुन्हा मैदानात...
एबीपी माझा वेब टीम | 09 Feb 2020 08:10 PM (IST)
मुख्य सामन्याच्या ब्रेकमध्ये प्रेक्षकांना सचिन आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला गोलंदाजामधलं द्वंद्व पाहायला मिळालं. सचिननं एलिस पेरीच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून आपल्या चाहत्यांना खूश केलं.
ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियातल्या वणवाग्रस्तांच्या मदतनिधीसाठी आयोजित सामन्यानिमित्तानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर फलंदाजीसाठी पुन्हा मैदानात उतरला. मुख्य सामन्याच्या ब्रेकमध्ये प्रेक्षकांना सचिन आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला गोलंदाजामधलं द्वंद्व पाहायला मिळालं. सचिननं एलिस पेरीच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून आपल्या चाहत्यांना खूश केलं. ऑस्ट्रेलियन महिला गोलंदाज एलिस पेरी आणि एनाबेल सुथरलँड हिने सचिनला गोलंदाजी केली. दोघींनी मिळून सचिनला एक षटक फेकले. यात पेरीने सचिनला चार चेंडू फेकले. ज्यात तेंडुलकरने दोन चौकार खेचले. पेरिनंतर सचिनने एनाबेलाच्या दोन चेंडूचा सामना केला. यानंतर सचिनने साडेपाच वर्षानंतर पहिल्यांदा बॅट हातात घेतल्याचे सांगितले. ऑस्ट्रेलियात काही दिवसांपूर्वी बुशफायरमुळे लाखो जनावरे होरपळून मृत्युमुखी पडली होती. आगीमुळे अनेक घरांची राखरांगोळी झाली. या हानीमुळे नुकसान झालेल्यांना दिलासा देण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवृत्त क्रिकेटपटूंमध्ये एक सामना आयोजित केला आहे. हा सामना पॉटिंग इलेव्हन विरुद्ध गिलख्रिस्ट इलेव्हन यांच्यात खेळवण्यात आला. यावेळी ब्रेकच्या वेळेत सचिनने ऑस्ट्रेलियन महिला गोलंदाजांच्या गोलंदाजीवर फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियातल्या वणवाग्रस्तांच्या मदतनिधीसाठी आयोजित दहा दहा षटकांच्या सामन्यात पॉन्टिंग इलेव्हननं गिलख्रिस्ट इलेव्हनचा एका धावेनं निसटता पराभव केला. हा सामना मेलबर्नच्या जंक्शन ओव्हलवर खेळवण्यात आला. पॉन्टिंग इलेव्हननं या सामन्यात पाच बाद 104 धावांची मजल मारली होती. पण गिलख्रिस्ट इलेव्हनला सहा बाद 103 धावाच करता आल्या. संबंधित बातम्या : IND vs BAN, U 19 Final Score : बांगलादेशसमोर भारतीय संघाचं 178 धावांचं आव्हान Sachin Tendulkar | नवी मुंबईत 'तेंडुलकर मिडलसेक्स'ची क्रिकेट अॅकॅडमी | ABP Majha