Asian Games 2018 : भारताची महिला पैलवान विनेश फोगाटने जकार्ता एशियाडमध्ये सुवर्णपदकाची कमाई करून नवा इतिहास घडवला. एशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला पैलवान ठरली. ‘दंगल’फेम पैलवान महावीरसिंग फोगाट यांच्या लेकीने म्हणजे गीता फोगाटने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताला 2010 साली पहिल्यांदाच महिला कुस्तीचं सुवर्णपदक जिंकून दिलं होतं. तिचीच चुलत बहीण असलेल्या विनेशने एशियाडच्या मॅटवर फोगाट कुटुंबीयांच्या त्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावली.
पैलवान विनेश फोगाटने जकार्ता एशियाडमध्ये नवा इतिहास घडवला. विनेश फोगाट ही एशियाडचं सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली महिला पैलवान ठरली. विनेश फोगाटने जपानच्या युकी इरीचा 6-2 असा पराभव करून भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपाठोपाठ विनेशचं हे सलग दुसरं सुवर्णपदक ठरलं.
रिओ ऑलिम्पिकच्या मॅटवर झालेल्या गंभीर दुखापतीने विनेशचं आव्हान संपुष्टात आणलंच, पण ती पुन्हा कुस्ती खेळू शकेल का याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण हरयाणवी वीरांगनेने आपल्या फिटनेसवर कठोर मेहनत घेऊन दुखापतीवर मात केली आणि आधी कॉमनवेल्थ गेम्स आणि मग एशियाडमध्ये भारताची मान पुन्हा एकदा उंचावली.
विनेश फोगाटला 2014 सालच्या इन्चिऑन एशियाडमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. पण त्यामुळे निराश न होता तिने आपला आदर्श असलेल्या सुशील कुमारचा दिलेला सल्ला शिरसावंद्य मानला.
विनेश म्हणते की, 2014 सालच्या एशियाडमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावं लागल्यावर सुशीलकुमार तिला म्हणाला होता... निराश होऊ नकोस. जे घडतं ते चांगल्यासाठी असतं. कदाचित यापेक्षाही जास्त मोठं यश तुझ्या नशिबात नक्कीच लिहिलेलं असेल. सुशीलकुमारचे ते शब्द खरे ठरले आहेत.
विनेश फोगाटच्या खात्यात लागोपाठच्या दोन एशियाडमधल्या दोन पदकांशिवाय आणखीही पदकं जमा झाली आहेत. 2014 आणि 2018 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने दोन सुवर्णपदकांची कमाई केली. 2013 ते 2018 या कालावधीतल्या पाच आशियाई कुस्ती स्पर्धांत तिने तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली आहे. राष्ट्रकुल कुस्तीचेही एक रौप्यपदक तिच्या खजिन्यात जमा आहे.
दुखापत हा खेळाडूंच्या कारकीर्दीतला अविभाज्य घटक असतो. छोट्यामोठ्या दुखापतीनंतर निराश न होता, आधी फिटनेसवर आणि मग खेळावर मेहनत घेतली तर त्या खेळाडूला नव्यानं कारकीर्दीची बांधणी करता येऊ शकते. विनेश फोगाटने ते करून दाखवलं आहे. म्हणूनच भारतीय कुस्तीला आता तिच्याकडून टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा आहे.
आता लक्ष्य एकच... टोकियो ऑलिम्पिक
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
22 Aug 2018 08:45 PM (IST)
विनेश फोगाट ही एशियाडचं सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली महिला पैलवान ठरली. विनेश फोगाटने जपानच्या युकी इरीचा 6-2 असा पराभव करून भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -