सिंगापूर : रशियाच्या स्वेतलाना कुझ्नेत्सोवाने कोर्टवर स्वतःच स्वतःचा हेअरकट केला. सिंगापूरमध्ये डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेत गतवेळच्या विजेत्या अॅग्निएस्का रद्वांस्काविरुद्धच्या साखळी सामन्यात ही घटना घडली.


खेळताना केसांची वेणी अडचणीची ठरु लागल्याने कुझनेत्सोव्हाने ती कापण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या निर्णायक सेटच्या सुरुवातीला स्वेतलाना 1-2 ने पिछाडीवर होती. त्यानंतर तिने ब्रेकची आणि दोन कात्रींची मागणी केली. मग तिने स्वत:च कात्री घेऊन वेणी कापली. त्यानंतर तिला अश्रू अनावर झाले. तिने टॉवेलमध्ये तोंड लपवलं. पण लगेचच ती नॉमर्ल झाली.

कापलेले केस खुर्चीवर फेकून ती उर्वरित सामना खेळण्यासाठी कोर्टवर पोहोचली. तीन तासांपेक्षा जास्त वेळ चाललेला हा सामना तिने विजय मिळवूनच संपवला. डिफेन्डिंग चॅम्पियन अॅग्निएस्का रद्वांस्काला नमवत कुझ्नेत्सोव्हाने हा सामना 7-5 1-6 7-5 असा जिंकला.

दोन ग्रॅण्ड स्लॅम विजेती स्वेतलाना कुझ्नेत्सोवा 2009 नंतर पहिल्यांदाच सिंगापूरमधील डब्ल्यूटीए फायनल्स टुर्नामेंटमध्ये सहभागी झाली होती. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी कुझ्नेत्सोव्हाला या स्पर्धेचं तिकीट मिळालं होतं.

पाहा व्हिडीओ