चित्रपट निर्माते रॉनी स्क्रूवाला यांनी सानियाच्या बायोपिकचे अधिकार विकत घेतले आहेत. या सिनेमात सानियाचं प्रोफेशनल आणि खासगी आयुष्य उलगडलं जाणार आहे. या चित्रपटासाठी लवकरच दिर्ग्दशकाची निवड होणार आहे. त्यानंतर इतर व्यक्तिरेखा निवडल्या जाणार आहेत. त्यामुळे तिचा पती आणि क्रिकेटर शोएब मलिकची व्यक्तिरेखा कोण साकारणार याची उत्सुकता लागली आहे.
सानियाचा जन्म मुंबईत झाला होता. परंतु जन्मानंतर ती आई-वडिलांसह हैदराबाद गेली. सानियाने वयाच्या सहाव्या वर्षीच टेनिस खेळण्यास सुरुवात केली होती, तर 2003 मध्ये तिने प्रोफेशनल टेनिस खेळायला सुरुवात केली. 2003 मध्ये तिने विम्बल्डनच्या महिला दुहेरीचं विजेतेपद पटकावलं होतं. यानंतर तिने सहा ग्रॅण्डस्लॅम महिला दुहेरी तसंच मिश्र दुहेरी विजेतेपदांवर नाव कोरलं.

याशिवाय भारत सरकारने सानियाला पद्मश्री, पद्मभूषण, राजीव गांधी खेल रत्न आणि अर्जुन इत्यादी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. सानिया मिर्झाने 12 एप्रिल 2010 रोजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केलं. सानिया लवकरच आई बनणार आहे.
याआधी भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंह, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंह यांच्या आयुष्यावर चित्रपट आले आहेत. तर बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्र यांचे बायोपिकही रांगेत आहेत. त्यात आता सानियाच्या बायोपिकची भर पडली आहे.