नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी गुरुवारी निवडणूक होत आहे. यामध्ये एनडीएकडून जेडीयूचे खासदार हरीवंश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे पंजाबमधील मोठा पक्ष आणि एनडीएचा मित्र पक्ष अकाली दलने नाराजी व्यक्त केली आहे. अकाली दल मतदानापासून दूर राहण्याची शक्यता आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी हरीवंश यांच्या नावावर सहमतीसाठी अकाली दलचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्याशी स्वतः चर्चा केली. अकाली दल निवडणुकीत अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. असं झाल्यास अकाली दलने एनडीएची साथ न देण्याची ही पहिलीच वेळ असेल.

राज्यसभेत अकाली दलचे तीन खासदार आहेत. मात्र पक्षीय बलाबल पाहता विरोधक आणि एनडीएसाठी एक एक मत महत्त्वाचं आहे. दुसरीकडे शिवसेनेनेही अविश्वास ठरावाच्या वेळी एनडीएच्या बाजूने उभं न राहता मतदानापासून दूर राहाण्याचा निर्णय घेतला होता.

अकाली दल आणि शिवसेनेने एनडीएच्या बाजूने मत न दिल्यास ही निवडणूक जिंकणं एनडीएसाठी अशक्य असेल. वरच्या सभागृहात एकाही पक्षाकडे बहुमत नसल्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार आहे. एनडीएकडे जास्त मतं असली तरी बहुमत नाही. बीजेडी, एआयडीएमके, तेलंगणा राष्ट्र समिती यांच्या भूमिकेवर सर्व काही अवलंबून असेल.

राज्यसभेत सध्या 244 सदस्य आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी 123 मतांची गरज आहे. एनडीएकडे सध्या 115 सदस्य आहेत, ज्यात भाजपचे सर्वाधिक 73 सदस्य आहेत. तर यूपीएच्या 113 जागांमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक 50 जागा आहेत. हरीवंश यांनी आपण जिंकू असा दावा केला आहे.

राज्यसभेत कोणत्या पक्षाकडे किती जागा?

एनडीए

भाजप 73

जेडीयू 6

शिवसेना 3

अकाली दल 3

एआयएडीएमके 13

आरपीआय 1

सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट 1

तेलंगणा राष्ट्र समिती 6

नागा पिपल्स फ्रंट 1

अपक्ष 4

नामनिर्देशित 3

एकूण 115

यूपीए

काँग्रेस 50

समाजवादी पक्ष 13

राष्ट्रवादी काँग्रेस 4

डीएमके 4

आरजेडी 5

इंडियन युनियन मुस्लीम लीग 1

केरळ काँग्रेस (एम)

झारखंड मुक्ती मोर्चा 0

सीपीआयएम 5

बसपा 4

सीपीआय 2

तेलुगू देसम पार्टी 6

जेडीएस 1

तृणमूल काँग्रेस 13

आम आदमी पक्ष 3

नामनिर्देशित 1

एकूण 113

इतर

बिजू जनता दल 9

वायएसआर काँग्रेस 2

इंडियन नॅशनल लोक दल 1

पीडीपी 2

अपक्ष 2

एकूण 16

रिक्त 1

एकूण 245