मुंबई : भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या मुलाला भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. इझहान मिर्झा-मलिकचा जन्म हैदराबादेतील रेनबो रुग्णालयात झाला. भारतीय पासपोर्ट मिळवण्यासाठी बाळाच्या पालकांना गृह मंत्रालयाकडे नाव नोंदवावे लागणार आहे.

'भारतात जन्म झालेल्या बाळाच्या पालकांची वेगवेगळी नागरिकत्व असतील, तर बाळाला आपोआप भारतीय पासपोर्ट मिळत असे. मात्र आता नियमात बदल झाले आहेत. बाळाला भारतीय पासपोर्ट जारी करण्यासाठी त्याचं नाव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे नोंदवणं अनिवार्य आहे' असं वरिष्ठ पासपोर्ट अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा उल्लेख 'डेक्कन क्रॉनिकल्स'च्या बातमीत आहे.

याचाच अर्थ इझहान मिर्झा मलिकला पाकिस्तानी किंवा दुहेरी नागरिकत्व मिळणार नाही. कुठल्याही भारतीयाला एकाच वेळी इतर देशाचं नागरिकत्व मिळवता येऊ शकत नाही. पाकिस्तानने काही देशांसोबत दुहेरी नागरिकत्वाचा करार केला आहे, मात्र त्यामध्ये भारताचा समावेश नाही.

सानियाने 30 ऑक्टोबरला पहाटे मुलाला जन्म दिला. शोएब मलिकने ट्विटरवर सानिया आई झाल्याची गोड बातमी दिली होती. विशेष म्हणजे गरोदरपणात एका प्रश्नाला उत्तर देताना सानियाने बाळाच्या नावात मिर्झा आणि मलिक अशी आडनावं असतील, असं स्पष्ट केलं होतं.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकने 2010 मध्ये लग्न केलं होतं. त्यांचं हे पहिलं अपत्य आहे. पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न केल्याने सानिया अनेक वेळा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असायची. पण तिने कायमच या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष केलं.