Tennis legend Chris Evert : टेनिसपटू ख्रिस एव्हर्टला (Chris Evert) कर्करोगाचे निदान झाले आहे. तिने स्वत: सोशल मीडियावरून आपल्याला गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती दिली आहे. मला गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले असून तो आता स्टेज 1 वर असल्याचे एव्हर्टने  सांगितले. 


 ख्रिस एव्हर्ट हीने आपल्या टेनिसच्या कारकिर्दीत 18 ग्रँड स्लॅम एकेरी आणि तीन ग्रँड स्लॅम दुहेरी विजेतीपदे जिंकली आहेत. कर्करोगाचे  निदान झाल्याची माहिती देताना एव्हर्टने ट्विटरवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. त्यासाठी मी सध्या केमोथेरपी घेत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.







 
एव्हर्टने कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती दिल्यानंतर तिला जगभरातून चाहते लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरूनही तिला लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तर तिची प्रतिस्पधी खेळाडू मार्टिना नवरातिलोव्हानेही ट्विट करून काळजी व्यक्त केली आहे. "आम्ही सर्व जण तुझ्याबरोबर आहोत. शिवाय आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तू खरी चॅम्पियन आहेस आणि मला शंका नाही की तू या  प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवशील," असे ट्विट मार्टिना नवरातिलोव्हाने केले आहे. 


मार्टिना नवरातिलोव्हा आणि  ख्रिस एव्हर्ट या दोघी 1973 पासून सुमारे 15 वर्षे एकमेकींच्या प्रतिस्पर्धक होत्या. त्यात 14 अंतिम सामन्यातत या दोघी आमनेसामने आल्या होत्या. 21 डिसेंबर 1972 रोजी ओहायो येथे झालेल्या महिलांच्या व्यावसायिक टेनिसच्या स्पर्धेत प्रथमच  एव्हर्टचा नवरातिलोव्हासोबत सामना झाला. या स्पर्धेत एव्हर्टने नवरातिलोव्हाचा पराभव केला.


एव्हर्टकडे 157 एकेरी विजेतेपद आहेत. सात वर्षे ती जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर होती. 1989 मध्ये एव्हर्टने निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर तिने काही काळ समालोचकाचे काम पाहिले. 


महत्वाच्या बातम्या