Nana Patole : नागपूर पोलिसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरासमोर सुरक्षा वाढवली आहे. नागपूरमधील रहाटे कॉलनी परिसरातील केशव कला या इमारतीत नाना पटोले राहतात. त्याठिकाणी सकाळपासूनच नागपूर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे. पोलीस नियंत्रण कक्षाची राखीव कुमक नाना पटोले यांच्या घरासमोर तैनात करण्यात आलेली आहे. नेहमीच्या सुरक्षा व्यतिरिक्त नियंत्रण कक्षाचे 14 पोलीस जवान आणि एक अधिकारीही पटोले यांच्या घरासमोर तैनात करण्यात आले आहेत. 


मिळालेल्या माहितीप्रमाणे सध्या नाना पटोले नागपुरात नाहीत. ते सध्या भंडाऱ्यात आहेत. दरम्यान, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एबीपी माझा ला दिलेल्या माहितीप्रमाणे नाना पटोले नागपुरात आल्यानंतर त्यांची वैयक्तिक सुरक्षा ही वाढवली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या संदर्भात नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.


काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. याविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. ठिकठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. भंडारा, नाशिक यानंतर आता नागपूरमध्ये देखील  नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. भाजपचे कार्यकर्ते नाना पटोले यांच्या घराकडे येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळेच त्यांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आही आहे. 


दरम्यान, जोपर्यंत नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि एफआयर (FIR) ची प्रत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमधून जाणार नसल्याची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलीय. यावेळी नागपूरमध्ये नाना पटोलेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आली. नाना पटोले यांनी मोदी यांच्याविरोधात भडकावू वक्तव्य केले असल्याचे बावनकुळे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका निर्माण करणे, मोदी यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांना पाठबळ देणे, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणे, जमावबंदी असताना जमाव तयार करणे,  समाजामध्ये तेढ निर्माण करणे, कोरोना नियमांचे पालन न करणे, देशात दंगे होती असे कृत्य करणे, आणि मोदी यांना जीवे मारण्याकरता षडयंत्र तयार करणे  या मुद्यातंगर्त  नाना पटोले यांच्यावर 7 गुन्हे दाखल करावे अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: