नवी दिल्ली : राहुल द्रविडची टीम इंडियाच्या परदेशातील कसोटी दौऱ्यांसाठी फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र द्रविड नवनियुक्त प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत श्रीलंका दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना दिली.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर परदेशातील कसोटी दौऱ्यांसाठी फलंदाजी सल्लागार म्हणून राहुल द्रविड आणि गोलंदाजी सल्लागार म्हणून झहीर खानची नियुक्ती करण्यात आली आहे.
राहुल द्रविडची नुकतीच पुन्हा एकदा भारतीय अ संघ आणि अंडर 19 संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय अ संघ ऑगस्टमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाईल. त्यामुळे द्रविडलाही भारतीय अ संघासोबत जावं लागणार असल्याने श्रीलंका दौऱ्यावर जाता येणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली.
दरम्यान गोलंदाजी सल्लागार झहीर खान कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाला मार्गदर्शन करण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.
द्रविड टीम इंडियासोबत प्रत्येक परदेश दौऱ्यावर जाईलच असं नाही. जेव्हा त्याची गरज असेल तेव्हा बोलवलं जाईल. कारण टीम इंडियाचा फलंदाजी सल्लागार म्हणून कोणताही वेगळा करार द्रविडशी करण्यात आलेला नाही, असंही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.
टीम इंडियाचा श्रीलंका दौरा
श्रीलंका दौऱ्यातील पहिला कसोटी सामना 26 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सराव सामना होणार नसल्याचीही माहिती आहे. दुसरा कसोटी सामना 3 ते 7 ऑगस्ट आणि तिसरा कसोटी सामना 12 ते 16 ऑगस्ट या काळात खेळवला जाणार आहे.
वन डे मालिकेची सुरुवात 20 ऑगस्ट रोजी दंबुलाच्या मैदानातून होणार आहे. दुसरा आणि तिसरा वन डे अनुक्रमे 24 आणि 27 ऑगस्टला खेळवला जाईल. तर चौथा आणि पाचवा वन डे खेट्टाराम इथे खेळवला जाणार आहे. याच मैदानावर एकमेव टी-20 सामनाही खेळवला जाईल.
श्रीलंकेचा संघ यापूर्वी 2015 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आला होता. टीम इंडिया जवळपास एका वर्षानंतर परदेशात पहिला कसोटी सामना खेळणार आहे. भारताने परदेशात अखेरचा कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. टीम इंडिया या दौऱ्यावर नव्या मुख्य प्रशिक्षकासोबत जाणार आहे.
द्रविड श्रीलंका दौऱ्यावर रवी शास्त्रींसोबत जाणार नाही
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2017 12:42 PM (IST)
द्रविड नवनियुक्त प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत श्रीलंका दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना दिली.
राहुल द्रविड
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -