मुंबई: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची नियुक्ती झाल्यानंतर आता गोलंदाजी प्रशिक्षक  म्हणून भरत अरुणची नियुक्ती होऊ शकते. आपल्याला हव्या असलेल्या स्टाफसाठी शास्त्रींनी थेट बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीकडं गाऱ्हाण मांडलं आहे. त्यामुळे आता गोलंदाजी कोच म्हणून भरत अरुण यांची वर्णी लागू शकते. असे संकेत सध्या मिळत आहे.

शास्त्रींनी यासाठी थेट बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे दार ठोठावत क्रिकेट सल्लागार समितीकडे (सीएसी) पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. सीएसीमध्ये गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे. याच समितीनं राहुल द्रविडला परदेश दौऱ्यावर फलंदाजी सल्लागार आणि झहीरला गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त केलं होतं.

बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानं क्रिकेटनेक्स्ट या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे की, 'शास्त्रींना हवा असणारा स्टाफ देण्याचं सीओएनं मान्य केलं आहे. सीओएच्या मते, मुख्य प्रशिक्षकाला कायमच गोलंदाजी कोचसोबत काम करायचं असतं. त्यामुळे दोघांमध्ये ताळमेळ असणं फारच आवश्यक आहे.'

गांगुलीच्या पसंतीनुसार झहीरची गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण गांगुली आणि शास्त्री यांच्यात फार काही चांगले संबंध नाही. त्यामुळेच शास्त्रींना हवा असणारा स्टाफ गांगुलीनं दिला नसल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

दरम्यान, सीओएनं शनिवारी स्पष्ट केलं की, द्रविड आणि झहीर यांच्या नावाची फक्त शिफारस करण्यात आली होती. याबाबतचा निर्णय हा मुख्य प्रशिक्षकांशी चर्चा करुनच घेतला जाईल. यासाठी बीसीसीआयनं एका नवी चार सदस्यीय समिती तयार केली असून ते द्रविड आणि झहीर यांच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णय घेतील.

दरम्यान, शास्त्रींना आपल्या आवडीचा स्टाफ हवा आहे. झहीरऐवजी त्यांनी आपल्या जवळचा मित्र भरत अरुणच्या नावाची गोलंदाजी कोच म्हणून शिफारस केली होती. शास्त्रींच्या मते, झहीर ही एक चांगली निवड आहे. पण भारतीय संघाला पूर्णवेळ गोलंदाजी कोच हवा आहे.

संबंधित बातम्या:

द्रविड आणि झहीर यांचा अपमान सुरु आहे: रामचंद्र गुहा