सिडनी : अखेर सिडनी कसोटी अनिर्णीत राहिली आणि विराट कोहलीच्या टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात घडवला नवा इतिहास. टीम इंडियानं टिम पेनच्या ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव करून, बोर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडेच कायम राखली.

टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात मिळवलेला हा कसोटी मालिका विजय ऐतिहासिक ठरला. कारण कसोटी सामन्यांच्या इतिहासात भारतानं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्याची ही पहिलीच वेळ होती. विराट कोहली आणि त्याच्या शिलेदारांनी गाजवलेल्या या पराक्रमाचं सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर उपस्थित भारतीय आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटरसिकांनी एकदिलानं कौतुक केलं. ऑस्ट्रेलियातल्या या विराट विजयाची अजित वाडेकरांच्या भारतीय संघानं १९७१ साली इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये मिळवलेल्या पहिल्या कसोटी मालिका विजयांशी तुलना करण्यात येत आहे.

भारतीय संघाचा आजवरचा हा बारावा ऑस्ट्रेलिया दौरा होता. भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यांची सुरुवात ही स्वातंत्र्योत्तर काळात झाली. लाला अमरनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली १९४७-४८च्या मोसमात भारतीय संघ पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर गेल्या ७१ वर्षांत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियातल्या अकरापैकी आठ कसोटी मालिकांमध्ये पराभवाची कटू चव चाखायला लागली. भारतीय संघानं या अकरापैकी तीन कसोटी मालिका बरोबरीत राखण्याची कामगिरी बजावली.

सुनील गावस्करांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघानं १९८०-८१ साली दौऱ्यातली तीन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत राखली. मग कपिलदेवच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाच्या १९८५-८६ सालच्या दौऱ्यातली तीन कसोटी सामन्यांची मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. त्यानंतर सौरव गांगुलीच्या टीम इंडियानं २००३-०४ सालच्या दौऱ्यात चार कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत राखली होती.

अखेर विराट कोहलीच्या टीम इंडियानं भारतीय क्रिकेटरसिकांना ऑस्ट्रेलियातल्या पहिल्या कसोटी मालिका विजयाचं सुख मिळवून दिलं. केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या महारथी फलंदाजांवर झालेली वर्षभराची बंदीची कारवाई भारतीय संघाच्या पथ्यावर पडली. ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्ट्यांचं बदललेलं भारतीय थाटाचं रुपही टीम इंडियाला हात देणारं ठरलं. पण भारतीय गोलंदाजांनी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यांपाठोपाठ ऑस्ट्रेलियातही प्रतिस्पर्धी फौजेला दोनदा गुंडाळण्याची दाखवलेली ताकद ही टीम इंडियाच्या यशाचं प्रमुख कारण ठरली.

ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला या मालिकेत शतक झळकावता आलं नाही. चार कसोटी सामन्यांमध्ये मिळून मार्कस हॅरिसची ७९ धावांची खेळी हाच ऑस्ट्रेलियाचा वैयक्तिक उच्चांक ठरला. त्यावरूनच भारतीय गोलंदाजांनी कसोटी मालिकेवर गाजवलेल्या वर्चस्वाची कल्पना यावी

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं पर्थच्या तुलनेत कठीण खेळपट्टीवर झळकावलेलं शतक ही या मालिकेतली सर्वोत्तम खेळी ठरली. पण भारताला कसोटी मालिकेवर वर्चस्व मिळवून दिलं ते चेतेश्वर पुजारानं झळकावलेल्या तीन शतकांनी आणि त्याच्या ५२१ धावांनी. साहजिकच सिडनी कसोटी आणि मालिकेतल्या सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही चेतेश्वर पुजाराला बहाल करण्यात आला.

रिषभ पंतला त्याच्या यष्टिरक्षण कौशल्यात अजूनही सुधारणा करण्याची गरज आहे. पण त्याच्या आक्रमक फलंदाजीनं खेळाला वारंवार कलाटणी मिळवून दिली. पंतनं या मालिकेत ३५० धावांचा रतीब घातला. तसंच परदेशातल्या कसोटी मालिकेत त्यानं यष्टिपाठी सर्वाधिक बळींचा विक्रम आपल्या नावावर जमा केला.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराची कामगिरी टीम इंडियाच्या मालिका विजयात निर्णायक ठरली. बुमरानं चार कसोटी सामन्यांमध्ये मिळून ३५७ धावांत २१ फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद शमीनं ४१९ धावांत १६ विकेट्स काढून हम किसीसे कम नही, हे पुन्हा दाखवून दिलं.

टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या पहिल्या कसोटी मालिका विजयाचा सर्वाधिक आनंद कर्णधार विराट कोहलीला होणं स्वाभाविक होतं. एका कॅलेंडर वर्षात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांमध्ये मिळून चार कसोटी जिंकणारा तो पहिला आशियाई कर्णधारही ठरला. इंग्लंडमधला आयसीसी विश्वचषक अवघ्या चार महिन्यांवर असताना, कसोटी क्रिकेटच्या दुनियेत मिळालेलं यश विराट कोहली आणि त्याच्या शिलेदारांचा आत्मविश्वास उंचावणारं आहे.