TikTok वर तरुणीचा फोटो लावून व्हिडिओ, तरुणाला पित्याचा चोप
एबीपी माझा वेब टीम | 07 Jan 2019 11:44 AM (IST)
उत्तर प्रदेशातील तैयब नावाच्या तरुणाने एका गाण्याचा टिकटॉक व्हिडिओ तयार केला होता. व्हिडिओत एका बाजूला तैयब गाणं गाताना दिसतो, तर दुसऱ्या बाजूला त्याच्याच गावातील एका तरुणीचा फोटो दिसतो. यामुळे गावात एकच गोंधळ उडाला
लखनौ : 'टिकटॉक' हे अॅप सध्या सोशल मीडियावर तूफान लोकप्रिय आहे. अनेक जण यावर चित्रविचित्र व्हिडिओ पोस्ट करुन प्रसिद्धी मिळवताना दिसतात. उत्तर प्रदेशातील एका तरुणाने 'टिकटॉक' व्हिडिओ करताना गावातील तरुणीचा फोटो वापरला होता. त्यामुळे गावात पंचायत बोलवण्यात आली आणि खांबाला बांधून तरुणाला त्याच्याच पित्याने चोप दिला. यूपीतील सहारनपूरमध्ये ताजपुरा गावात राहणारा तैयब TikTok या अॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध गाण्याचा टिकटॉक व्हिडिओ त्याने तयार केला होता. व्हिडिओत एका बाजूला तैयब गाणं गाताना दिसतो, तर दुसऱ्या बाजूला त्याच्याच गावातील एका तरुणीचा फोटो दिसतो. तैयबने हा व्हिडिओ शेअर करताच वायरल व्हायला वेळ लागला नाही. व्हिडिओ वायरल होताच गावात एकच हलकल्लोळ माजला. तैयबच्या वडिलांकडे या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आणि तात्काळ पंचायत बोलावण्यात आली. घाबरलेल्या तैयबने तात्काळ व्हिडिओही डिलीट केला. दुसरीकडे पंचायत भरली आणि पंचांनी शिक्षेचं फर्मान सोडलं. तैयबला त्याच्या वडिलांनीच चोप द्यावा असे आदेश देण्यात आले. दोघांनी तैयबला पकडलं आणि वडिलांनी त्याला यथेच्छ चोप दिला. या प्रकाराचा व्हिडिओही मूळ 'टिकटॉक' इतकाच वायरल झाला.