ऑस्ट्रेलियाचा 261 दुसरा डाव धावांत आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमराने तीन आणि रविंद्र जाडेजानं तीन तर ईशांत शर्मा आणि मोहम्मह शमीनं दोन विकेट्स घेतल्या. भारतानं ऑस्ट्रेलियन भूमीवर एकाच मालिकेत दोन कसोटी जिंकण्याची ही केवळ दुसरीच वेळ ठरली. याआधी 1977 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतानं मालिकेत दोन कसोटी जिंकल्या होत्या.
चौथ्या दिवशी पॅट कमिन्स आणि नॅथन लायनच्या झुंजार भागिदारीमुळे मेलबर्न कसोटीत टीम इंडियाला विजयासाठी पाचव्या दिवसाची प्रतिक्षा करावी लागली. ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसअखेर आठ बाद 258 धावांची मजल मारली होती. पॅट कमिन्स 61 तर नॅथन लायन 7 धावांवर खेळत होते. यात पॅट कमिन्सने केवळ 2 धावांची भर घातली. तर लायन 7 धावांवर बाद झाला.
चौथा दिवस
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही भारतीय आक्रमणासमोर लोटांगण घातलं. पण चौथ्या दिवशी कमिन्स आणि लायन या जोडीनं नवव्या विकेटसाठी अभेद्य 43 धावांची भागीदारी करत भारताचा विजय लांबवला. भारताकडून रविंद्र जाडेजानं तीन फलंदाजांना माघारी धाडलं. जसप्रीत बुमरा आणि शमीने दोन तर ईशांत शर्माने एक विकेट घेतली होती. त्याआधी पहिल्या सत्रात भारतानं दुसरा डाव आठ बाद 106 धावांवर घोषित केला होता.
तिसरा दिवस
टीम इंडियानं मेलबर्न कसोटीत पहिल्या डावात 292 धावांची मोठी आघाडी घेतली खरी, पण दुसऱ्या डावात भारताची पाच बाद 54 अशी दाणादाण उडाली. अर्थात या परिस्थितीतही या कसोटीवर टीम इंडियाचा वरचष्मा दिसून आला होता.
सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने एकूण 346 धावांची आघाडी मिळवली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी मयांक अगरवाल 28, तर रिषभ पंत सहा धावांवर खेळत होता. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं दुसऱ्या डावात टीम इंडियाला एकापाठोपाठ एक दणके दिले. त्याने हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेला स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर जोश हेजलवूडनं रोहित शर्माला बाद करुन टीम इंडियाला पाचवा धक्का दिला होता.
दुसरा दिवस
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या मेलबर्न कसोटीत दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिला डाव सात बाद 443 धावांवर घोषित केला. पुजाराने कसोटी कारकीर्दीतलं आपलं सतरावं शतक साजरं केलं. पुजाराने 10 चौकारांसह 106 धावांची खेळी उभारली. तर कर्णधार कोहलीनं नऊ चौकारांसह 82 धावांचं योगदान दिलं.
पुजारा आणि विराटनं तिसऱ्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर आलेल्या रोहित शर्मानंही 63 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने तीन आणि मिचेल स्टार्कने दोन फलंदाजांना माघारी धाडलं. तर नॅथन लायन आणि हेजलवूडनं प्रत्येकी एक विकेट घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद आठ धावांची मजल मारली होती.
पहिला दिवस
पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकांच्या जोरावर दोन बाद 215 धावांची मजल मारली होती. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार कोहली 47 तर पुजारा 68 धावांवर खेळत होता.
विराट आणि पुजारानं तिसऱ्या विकेटसाठी रचलेली 92 धावांची अभेद्य भागीदारी आणि पदार्पणवीर मयांक अगरवालची अर्धशतकी खेळी हे पहिल्या दिवसाचं वैशिष्ट्य होतं. मयांकनं आठ चौकार आणि एका षटकारासह 76 धावांची खेळी उभारली.
भारताचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून कर्नाटकच्या मयांक अगरवालनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.