लंडन : दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्सने धुव्वा उडवून टीम इंडियाने उपांत्य सामन्यात धडक मारली आहे. भारताने आधी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची आणि नंतर गोलंदाजांची दाणादाण उडवत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील या सामन्यात दणदणीत विजय मिळवला.


उपांत्य सामन्यात भारताची टक्कर बांगलादेशसोबत होणार आहे. बांगलादेशने साखळी सामन्यात न्यूझीलंडला घरचा रस्ता दाखवत उपांत्य सामन्याचं तिकीट बूक केलं. त्यामुळे बलाढ्य न्यूझीलंडला हरवलेला बांगलादेश संघ नव्या ताकदीने भारताविरुद्ध खेळायला उतरेल.

दरम्यान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशची दाणादाण उडवली होती. भारताने तब्बल 240 धावांनी विजय साजरा केला होता. तर बांगलादेशचा संपूर्ण संघ शंभर धावांच्या आत म्हणजे केवळ 84 धावांवरच गुंडाळला होता.

गतविजेत्या भारताची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात धडक मारण्याची ही पाचवी वेळ आहे. याआधी भारताने 1998, 2000, 2002, 2013 आणि आता 2017 मध्येही उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे.

दरम्यान भारताच्या या विजयासोबतच दुसऱ्या उपांत्य सामन्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. मात्र उद्या होणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध श्रीलंका सामन्यानंतर 14 तारखेला खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्याचं चित्र स्पष्ट होणार आहे. पाकिस्तान किंवा श्रीलंका या दोन्ही संघांपैकी एक संघ 14 जूनला इंग्लंडसोबत भिडणार आहे.