भोपाळ : मध्य प्रदेशात शांतता नांदावी, यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी अनिश्चित काळासाठी उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आपलं हे उपोषण मागे घेतलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास जोशी यांनी शिवराजसिंह चौहान यांना नारळ पाणी देऊन, हे उपोषण सोडवलं.
मध्य प्रदेशमधील मंदसौरमध्ये शेतकरी आंदोलनाचे तीव्र पडसाद राज्याच्या इतरही भागात उमटू लागल्याने, राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कालपासून अनिश्चित काळासाठी उपोषण सुरु केलं होतं. पण आज त्यांनी हे आपलं उपोषण मागं घेतलं.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंदसौरमधील शेतकरी आंदोलनात पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी आपलं हे उपोषण मागे घेतलं.
उपोषण मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, ''जेव्हा कधीही शेतकऱ्यांवर संकट ओढावलं, तेव्हा प्रत्येकवेळी मी नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूनं उभा राहिलो. मी एसीमध्ये बसून निर्णय घेणारा नेता नाही, तर मंत्रालयातून बाहेर पडून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाऊन निर्णय घेतले. म्हणूनच आज मंदसौरमधील पीडित कुटुंबियांनी माझी भेट घेऊन, उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच त्यांनी आपल्या गावी येण्याचं आमंत्रण ही दिलं आहे.''
दुसरीकडे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या उपोषणावेळी भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. मंदसौरमधील परिस्थीती चिघळण्यासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचं सांगत, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि खासदार प्रभात झा यांनी काँग्रेस या आंदोलनाचं राजकारण करत असल्याचा आरोप केला.
तर भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधींची नौटंकी सुरु असून, त्यांना सुबुद्धी मिळावी यासाठी यज्ञ करण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशात कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. पोलिसांच्या गोळीबारात आतापर्यंत 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तरीही मध्य प्रदेशातील आंदोलन थांबायचं नाव घेत नाही.